
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये यु्द्ध सुरू होऊन आज 13 दिवस झाले आहेत. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणाचा मोठा फटका हा भारताला बसत आहे. मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. इराणकडून होर्मुज स्ट्रेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अनेक कच्च्या तेलाचे जहाज तिथे अडकून पडले आहेत. भारतामध्ये आता गॅस तुटवडा जाणवत असून, गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपली हॉटेलं बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान त्यानंतर आता देशात इंधनाची नेमकी स्थिती काय आहे? याबाबत केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या शर्मा?
भारताला दिवसाकाठी जवळपास 55 लाख बॅरल कच्च्या तेलाची गरज आहे. सध्या तरी कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. भारत हा जागातील सर्वात मोठा चौथा रिफायनरी देश आहे. तसेच देशांतर्गत कच्च्या तेलाचं उत्पादन देखील 28 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती यावेळी शर्मा यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, देशात पेट्रोलियम उत्पादनाची कोणतीही कमी नाहीये. भारताला एका दिवसाला जेवढा नॅचरल गॅस लागतो, त्यातील जवळपास 60 टक्के गरज ही आयातीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. सध्या गॅसचा पुरवठा देखील सुरळीत सुरू आहे. राज्यांना केंद्राकडून कमर्शियल गॅस सिलिंडर सोबतच 48,000 लीटर रॉकेचा देखील पुरवठा केला जाईल. सोबतच कोळशाचा पुरवठा देखील वाढवण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील लोकांना 45 दिवसांनी सिलिंडर मिळेल, तर शहरी भागातील नागरिकांना दर 25 दिवसांनी एका सिलिडंरचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी राजेश कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, जहाजांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. कट्रोल रूम 24 तास सुरू असणार आहे. भारतीय नाविकांच्या सुरक्षेला भारत सरकार सर्वोच्च प्राथमिकता देत आहे, असं राजेश कुमार यांनी म्हटलं आहे. तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दुतावास सक्रिय असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.