
आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. विशाखापत्तनमदुव्वाडा येथून एर्नाकुलम येथे जाणाऱ्या टाटा-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन नंबर 18189) च्या दोन एसी कोचमध्ये भीषण आग लागली. एलामंचिली रेल्वे स्टेशन जवळ मध्यरात्री 1.30 च्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला तेव्हा बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या पँट्री कारजवळ असलेल्या बी-1 आणि एम-2 एसी कोचमध्ये आग लागली.
अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन दलाचे जवान पोहोचेपर्यंत दोन्ही डबे पूर्णपणे आगीत जळून खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेत होरपळून अनेक जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रेनमध्ये अफरा-तफरी
मध्यरात्रीच्या सुमारास ट्रेन एलामंचिली पोहोचत होती, मात्र तेव्हाच गाडीच्या एका कोचमध्ये आग लागली, बघता बघता ती दुसऱ्या कोचमध्येही पसरली. तेव्हा बरेच प्रवासी झोपेत होते, मात्र धूर आणि आगीच्या ज्वाळा जाणवू लागताच अनेकांन त्रास होऊ लागला, आग लागल्याचे जाणवताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला. घाबरलेल्या प्रवाशांनी ट्रेनमधून उतरून आपले प्राण वाचवण्यासाठी स्टेशन परिसरात धाव घेतली. संपूर्ण रेल्वे स्टेशन धुराने आणि आगीने वेढले होते. अनकापल्ले, एलामानचिली आणि नक्कापल्ले येथील अनेक अग्निशमन दलाच्या गाड्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
कशामुळे लागली आग ?
बी-1 एसी कोचमध्ये ब्रेक जाम झाल्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या अपघातात बी-1 कोचमध्ये प्रवास करणारे विशाखापट्टणम येथील 70 वर्षीय रहिवासी चंद्रशेखर सुंदर यांचा जळून मृत्यू झाला. तर सुमारे 20-22 प्रवासी जखमी झालेत. या अपघातामुळे विशाखापट्टणम-विजयवाडा रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.पहाटे 3:30 नंतर पर्यायी गाड्या आणि बसेस वापरून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्याची व्यवस्था केली जात आहे असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी एर्नाकुलम एक्सप्रेसमधील आगीच्या या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून संपूर्ण माहिती मिळवली असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले. रेल्वे सेवा जलद गतीने पूर्ववत करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितलं.