मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर अपघात, एअर इंडियाच्या विमानाला लागली आग

दिल्ली विमानतळावर आज एक मोठा अपघात झाला आहे. हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याचे समोर आले आहे.

मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर अपघात, एअर इंडियाच्या विमानाला लागली आग
Plane Fire Delhi
| Updated on: Jul 22, 2025 | 6:55 PM

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. दिल्ली विमानतळावर आज एक मोठा अपघात झाला आहे. हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला आग लागल्याचे समोर आले आहे. विमानाच्या पॉवर युनिटमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. या विमानातील क्रू मेंबर्स देखील सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

पॉवर युनिटमध्ये लागली आग

समोर आलेल्या माहितीनुसार, हे विमान उतरल्यानंतर गेटवर पार्किंग करण्यात आले होते. यानंतर लगेच पॉवर युनिटमध्ये आग लागली. एअर इंडियाने याबाबबत एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले की, प्रवाशांनी विमानातून खाली उतरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ही आग लागली. या आगीमुळे विमानाचे थोडे नुकसान झाले आहे, मात्र सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. विमान सध्या सुरक्षित ठिकाणी असून आगीच्या घटनेची चौकशी सुरू करण्यात येत आहे.

आगीच्या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियामक डीजीसीएलाही या घटनेची दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे एअर इंडिया कंपनीने आज एक निवेदन जारी करून, आपल्या बोईंग 787 आणि 737 विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचच्या लॉकिंग सिस्टमची तपासणी पूर्ण केली असल्याची माहिती दिली होती. आता या दिवशी विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशी सुरु असताना एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने आपल्या प्राथमिक अहवालात, अपघातापूर्वी विमानाचे इंधन स्विच बंद करण्यात आले होते अशी माहिती दिली होती. त्यानंतर डीजीसीएने एअर इंडियाला 21 जुलैपर्यंत आपल्या बोईंग 787 आणि 737 विमानांमधील इंधन स्विचच्या लॉकिंग सिस्टमची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. ही तपासणी आता पूर्ण झाली आहे. मात्र या तपासणीचा अहवाल सादर झाला त्याच दिवशी विमानाचा पुन्हा अपघात झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.