मोठी बातमी! आधी टॅरिफ आता डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींना चार फोन, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग

टॅरिफ वाद सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेस फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

मोठी बातमी! आधी टॅरिफ आता डोनाल्ड ट्रम्प यांचे मोदींना चार फोन, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग
| Updated on: Aug 26, 2025 | 7:20 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, 28 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. आधी ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेनं जरी भारतावर टॅरिफ लावला असला तरी देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या टॅरिफच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेमधील संबंध ताणल्याचे पहायला मिळत आहे.

आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफचा वाद सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेस फोन केले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधला नाही. याबाबत जर्मनीच्या एका वृत्तपत्रानं दावा केला आहे. यावरून अमेरिका आणि भारतात सर्व काही सुरळीत सुरू नसल्याचा दावाही या वृत्तपत्राकडून करण्यात आला आहे.

जर्मनीच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राकडून असा दावा करण्यात आला आहे की, टॅरिफचा वाद सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करून चारवेळेस बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्याशी एकदाही बोलले नाहीयेत. मात्र अद्याप अमेरिका आणि भारत सरकारकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाहीये.

दरम्यान ही पहिली वेळ नाहीये, तर यापूर्वी देखील पाकिस्तानसोबत भारताचा संघर्ष निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी मोदींसोबत फोनवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंतप्रधान मोदी हे त्यांच्याशी देखील बोलले नव्हते, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत माहिती दिली होती. युद्धविरामाच्या एक दिवस आधी अमेरिकेचे उपराष्ट्रपती यांनी तीन ते चार वेळेस फोन करून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मी बैठकांमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.