माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव याचा लहान भाऊ आणि मुलायम सिंह यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश  यादव यांच्या लहान भावाचं निधन
प्रतीक यादव
| Updated on: May 13, 2026 | 8:05 AM

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं निधन झालं आहे. लखनऊ येथील शासकीय रुग्णालयात प्रतीक यादव यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक आणि मुलायम सिंह यादव यांचे पुत्र होते. प्रतीक यादव यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगितलं जात आहे.प्रतीक यादव यांनी वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. प्रतीक यादव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते मुलायम सिंह यादव आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी साधना गुप्ता यांचे लहान पुत्र होते. तर अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ होते.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती  स्थिर नसल्यामुळे प्रतीक यादव यांना लखनऊ येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. प्रतीक यादव भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती होता… कठीण परिस्थितीत प्रतीक यादव यांचे कुटुंबिय त्यांच्या सोबत होते. अशी माहिती देखील समोर येत आहे.

सांगायचं झालं तर, एका आठवड्यापूर्वी, प्रतीक यादव आजारी पडल्यानंतर त्यांना लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी देखील आणण्यात आलं. प्रतीक मेदांतामध्ये असताना अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांनी त्यांची भेट घेतली होती. प्रतीक त्यांच्या फिटनेसबद्दल खूप गंभीर होते. पण त्यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे…

प्रतीक यादव कोण होते?

प्रतीक यादव राजकीय कुटुंबातील असले तरी, ते स्वतः राजकारणापासून अलिप्त होते. आपल्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी टाळून, प्रतीक यादव यांनी रिअल इस्टेट आणि फिटनेस उद्योजकतेच्या क्षेत्रात काम केलं. त्यांनी युनायटेड किंगडममधील लंडन येथील लीड्स विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली. ते प्रचंड फिटनेस फ्रिक होते. लखनऊ येथे त्यांचा जीमचा व्यवसाय देखील होता. प्रतीक यांनी कधीच कोणती निवडणूक लढवली नाही. शिवाय पक्षात देखील कोणती मोठी जबाबदारी स्वीकारली नाही. त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

 

 

Follow Us