CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं

CM Joseph Vijay : तामिळनाडूचे मुंख्यमंत्री विजय यांच्यावर टीका केल्यामुळे डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे.

CM विजय यांचा DMK ला दणका, माजी मंत्र्याच्या अटकेने खळबळ; ते विधान भोवलं
anita r radhakrishnan arrested
Image Credit source: Google
| Updated on: Jul 03, 2026 | 4:35 PM

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यापासून मुख्यमंत्री विजय जोसेफ हे नेहमीच चर्चेत आहेत. अशातच आता विजय यांच्यावर टीका केल्यामुळे डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर राधाकृष्णन यांना पोलिसांनी अटक केली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तूतीकोरिनपासून सुमारे 23 किलोमीटर अंतरावर अथूर येथे दौऱ्यावर असताना राधाकृष्णन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी घोषणाबाजी करत पोलिस कारवाईचा निषेध केला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अटक करण्याचे कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, राधाकृष्णन यांनी 20 जून रोजी मुख्यमंत्री विजय यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर टीव्हीकेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 352 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे) आणि कलम 353(2) (सार्वजनिक अशांतता निर्माण करणारी विधाने करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायमूर्ती जी. के. इलंथिरैयन यांनी म्हटले की, आमदार म्हणून राधाकृष्णन यांनी अशा प्रकारची विधाने करणे योग्य नव्हते. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

एमके स्टालिन यांची सरकारवर टीका

डीएमके अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी राधाकृष्णन यांच्या अटकेवरून सरकारवर टीका केली आहे. राधाकृष्णन आपल्या मतदारसंघात असताना त्यांना अटक करण्याची एवढी घाई का करण्यात आली, असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना स्टॅलिन यांनी म्हटले की, ‘सत्ताधारी टीव्हीकेने त्यांच्या एका आमदाराविरोधातील सामूहिक बलात्काराच्या आरोपांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्य सरकार हत्या, दरोडे आणि महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यात अपयशी ठरत आहे; मात्र विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात मात्र तत्परता दाखवत आहे.

विरोधकांना लक्ष्य करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न – स्टॅलिन

स्टालिन यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री जनतेसाठी काम करण्याऐवजी विरोधी नेत्यांना अटक करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएमकेच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांनीही या अटकेचा निषेध करत, अशा दडपशाहीच्या राजकारणापुढे डीएमके झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Follow Us