India-UK FTA : भारत-यूके फ्री ट्रेड डीलमुळे स्वस्त होणार या गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !

भारत आणि ब्रिटनमधील फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (मुक्त व्यापार करार) मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने आणि फॅशनच्या वस्तू अशा अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात. यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल आणि भारतीय उद्योगांनाही फायदा होईल. मात्र, ऑटोमोबाईल आणि धातूसारख्या काही क्षेत्रांमध्ये किमती वाढू शकतात. या करारामुळे रोजगार आणि निर्यातीला चालना मिळेल.

India-UK FTA : भारत-यूके फ्री ट्रेड डीलमुळे स्वस्त होणार या गोष्टी, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !
India-UK FTA
| Updated on: Jul 24, 2025 | 10:25 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. 23 ते 24 जुलैपर्यंत असणाऱ्या या दौऱ्यादरम्यान भारत आणि यूके या दोघांमध्ये एक ऐतिहासिक करार होणार आहे, तो म्हणजे भारत-यूके फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (FTA).
या कराराला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आधीच मान्यता दिली आहे आणि आता ब्रिटनमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वाक्षरीने तो औपचारिक होणार आहे. या मुक्त व्यापार कराराचा परिणाम केवळ कंपन्या किंवा व्यावसायिकांपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरही होईल. अनेक गोष्टी स्वस्त होऊ शकतात, तर काही गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

फ्री ट्रेड ॲग्रीमेंट (FTA) म्हणजे काय ?

फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार. हा असा करार आहे, ज्यामध्ये दोन देश एकमेकांमधील आयात आणि निर्यातीवरील सीमाशुल्क कमी करतात किंवा पूर्णपणे रद्द करतात. याचा फायदा असा की दोन्ही देशांची उत्पादने एकमेकांच्या बाजारपेठेत स्वस्त दरात पोहोचतात. भारत-यूके एफटीए अंतर्गत, भारतातून यूकेला जाणाऱ्या 99 % उत्पादनांवर कोणताही कर लागणार नाही, तर भारत यूकेमधून येणाऱ्या 90 % वस्तूंवरील कर कमी करेल.

या गोष्टी होऊ शकतात स्वस्त

मोबाईल, लॅपटॉप आणि गॅझेट्स:  इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील कर कमी झाल्यामुळे या वस्तू स्वस्त होऊ शकतात.

शूज, कपडे आणि फॅशन उत्पादने: आता यावर शून्य कर असेल किंवा खूप कमी कर असेल, ज्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी होऊ शकतात.

दागिने : यूकेमधून येणाऱ्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्याने त्यांच्या किमतीही कमी होऊ शकतात.

चामड्याची उत्पादनं: चामड्याचे जॅकेट, बॅग्ज आणि शूज यासारख्या वस्तू आता परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतात.

औषधांच्या किमतींवर संमिश्र परिणाम

भारत आणि ब्रिटनमध्ये औषधांचा व्यापार दुतर्फा आहे. भारत ब्रिटनला औषधे निर्यात करतो आणि तेथून काही औषधं आयातही करतो. त्यामुळे, एफटीए नंतर काही औषधांच्या किमती कमी होऊ शकतात, परंतु काही प्रकरणांमध्ये ती महाग देखील होऊ शकतात. याचा थेट परिणाम दोन्ही देश कोणत्या औषधावरील किती शुल्क कमी करतात यावर होईल.

या गोष्टी महागण्याची शक्यता

उच्च दर्जाच्या कार आणि बाईक : यूकेमधून येणाऱ्या लक्झरी वाहनांना तुलनेने कमी कर सवलत मिळू शकते आणि त्यामुळे त्यांच्या किमती वाढू शकतात.

धातू आणि स्टील उत्पादने : भारत आता यूकेमधून उच्च दर्जाच्या धातूला देशांतर्गत बाजारात प्रवेश देऊ शकेल, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांवर दबाव येईल आणि किमती वाढू शकतात.

कृषी उत्पादनांवर सध्या कोणताही दिलासा नाही

या करारातून सध्या तरी भात आणि गहू यासारख्या कृषी उत्पादनांना थेट दिलासा मिळणार नाही. देशांतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून भारत सरकारने या क्षेत्रातील दर कमी करण्याचे टाळले आहे.

बेरोजगारी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो हा करार

या ट्रेड डीलमुळे भारतीय उत्पादन, कापड, सागरी आणि दागिने क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. यूकेच्या मोठ्या बाजारपेठेत सहज प्रवेश मिळाल्यास भारताची निर्यात वाढू शकते, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील.