पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहरचा खात्मा ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, डीजीएमओच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याचं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहरचा खात्मा ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू, डीजीएमओच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 11, 2025 | 8:23 PM

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला, या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट होती, या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले तसेच 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, दरम्यान आता भारत आणि पाकिस्तामध्ये युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आज लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांच्या उच्च अधिकाऱ्यांची एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देण्यात आली. भारतानं पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक मारले गेल्याचं डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी अधिकृतपणे सांगितलं आहे.

ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी म्हटलं आहे की, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला, भारतीय जवानांवर देखील हल्ले वाढत आहेत. जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हाच आम्ही निश्चय केला होता, की आता आम्ही गप्प बसणार नाहीत. याचा उत्तर दिलं जाईल, यातूनच आम्ही ऑपरेशन सिंदूर राबवलं.

9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त, 100 दहशतवाद्यांचा खात्मा

पुढे बोलताना जनरल घई यांनी सांगितलं की आम्ही सात मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 9 दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला, यामध्ये IC-814 हायजॅक आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड यूसुफ अजहर, अब्दुल मलीक रऊफ आणि मुदस्सिर अहमद हे कुख्यात दहशतवादी मारले गेले. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले.

भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने देखील भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तसेच सिमावर्ती भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आलास, पाकिस्तानकडून मुद्दामहून सामान्य नागरिकांची वस्ती असलेल्या भागांना टार्गेट करण्यात आलं, तसेच धार्मिक स्थळांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला.9 आणि 10 मे रोजी पाकिस्तानकडून रात्रीच्या सुमारास हे हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय सैन्य तळांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी माहिती घई यांनी यावेळी दिली. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याला प्रत्यु्त्तर म्हणून भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक देखील मारले गेले, आमचं टार्गेट हे पाकिस्तानमधील सामान्य नागरिक नव्हते तर दहशतवादी होते असंही, घई यांनी यावेळी सांगितलं.