
इराण युद्ध सुरु असताना भारतात एलपीजी सिलिंडर संदर्भात गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शहरात आणि गावात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. लोक रिकामे सिलिंडर घेऊन एजन्सीच्या बाहेर उभे आहेत. लवकरात लवकर गॅस सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारने आणि ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की देशातील एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. मात्र, ही स्थिती मुख्यत्वे घाबरल्यामुळे होत असलेल्या बुकींग आणि काही स्थानिक पातळीवर बुकींगच्या समस्यांमुळे येत आहे.
सोमवारी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात देखील असे प्रकार पाहायला मिळाले आहेत. नोएडा सेक्टर २२ मधील भारत गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगा लागण्याची चित्र होते. अनेक लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन रांगेत उभे होते आणि गॅस सिलिंडर मिळण्याची वाट पाहात होते. याच धर्तीवर उत्तर प्रदेशातही सीतापूर जिल्ह्यातील बर्डपूर गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लोक आपले रिकामे सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीच्या बाहेर बसलेले दिसत होते.असे म्हटले जात आहे की हा व्हिडीओ सात मार्च रोजीचा आहे. त्यादिवशी मोठ्या संख्येने लोक गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे होते.
अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की एलपीजीची वास्तविक कमतरता नाही. अनेक लोकांनी सांगितले त्यांना सहज गॅस सिलिंडर मिळत आहेत. एजन्सीला सिलिंडरचा पुरवठा देखील होत आहे. उत्तर प्रदेशातील एका महिलेने दावा केला की तिला १५०० रुपये देऊन काळ्या बाजारात सिलिंडर खरेदी करावा लागला आहे. महिलेने सांगितले की रमजानचा महिला चालू असून गॅसची गरज जास्त असल्याने मजबूरीमुळे तिला काळ्या बाजारातून सिलिंडर घ्यावा लागत आहे.
दिल्लीच्या दक्षिण भागात काम करणाऱ्या इंडेन गॅस एजन्सीच्या डिलीव्हरी पार्टनरने सांगितले की चार ते पाच दिवसांपासून गॅस सिलिंडरची बुकींग अचानक वाढली आहे. लोकांमध्ये घबराट पसरल्याने बुकींगमध्ये अचानक वाढ झाली आहे. परंतू पुरवठ्यामध्ये काही खास कमतरता नाही. इराण आणि अमेरिका – इस्राईलचे युद्ध सुरु असल्याने इंधनाचा तुटवडा होणार असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. युद्धाचा हा दहावा दिवस आहे. याच वेळी इराणने होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.