भारत-व्हिएतनाम व्यापार आणखी वाढणार, गौतम अदानी यांनी घेतली व्हिएतनामच्या बड्या नेत्यांची भेट

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस तो लाम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्हिएतनाम-भारत आर्थिक भागीदारी आणखी मजबूत करणार असल्याचे म्हटले.

भारत-व्हिएतनाम व्यापार आणखी वाढणार, गौतम अदानी यांनी घेतली व्हिएतनामच्या बड्या नेत्यांची भेट
Gautam Adani
| Updated on: Jul 30, 2025 | 9:42 PM

भारतातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक असणारे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस तो लाम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी व्हिएतनाम-भारत आर्थिक भागीदारी आणखी मजबूत करणार असल्याचे म्हटले. गौतम अदानी यांनी तो लाम यांच्या बंदरे आणि ऊर्जेसह इतर क्षेत्रात घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्या दूरदर्शी धोरणाचे कौतुक केले.

गौतम अदानी यांनी याबाबत एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं की, व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस तो लाम यांची भेट घेणे हा आनंदाचा क्षण आहे. ऊर्जा, बंदरे आणि विमान वाहतूक क्षेत्रात त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. या परिवर्तनकारी प्रवासात योगदान देण्यास आणि व्हिएतनाम-भारत आर्थिक भागीदारी मजबूत करण्यास आम्ही दोघेही उत्सुक आहोत असंही अदानी यांनी म्हटलं.

व्हिएतनाम-भारत व्यापार

भारत आणि व्हिएतनाममध्ये भूतकाळापासून व्यापार होत आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या आकडेवारीनुसार, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 15.76 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. यात गेल्या एका वर्षात 6.40 टक्के वाढ झाली आहे. भारताची व्हिएतनामला निर्यात 5.43 अब्ज डॉलर्स इतकी होती तर भारताची व्हिएतनाममधून आयात 10.33 अब्ज डॉलर्स इतकी होती. यावरूण हे स्पष्ट होते की, व्हिएतनाम हा भारताचा 20 वा सर्वात मोठा व्यापारी पार्टनर आहे.

व्हिएतनाममध्ये भारताची जहाजे

व्हिएतनाममध्ये संदीप आर्य हे भारतीय राजदूत आहेत, त्यांनी गेल्या आठवड्यात तिएन सा बंदराला भेट दिली. या भेटीवेळी भारतीय नौदलाची दिल्ली, शक्ती आणि किल्तान ही जहाजे दा नांग येथे आहेत. यातून दोन्ही देशांमध्ये सागरी संबंध अधिक समृद्ध होत असल्याचे समोर येते.

नौदलाच्या या जहाजांनी व्हिएतनामला भेट देणे ही भारताच्या ‘महासागर’ थीमचा एक भाग आहे. यातून भारत व्हिएतनाम सागरी संबंध आणखी घट्ट होणार आहेत. आगामी काळात इंडो-पॅसिफिक प्रदेशात सागरी व्यापाराला गती देण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांचे हे महत्वाचे पाऊल आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ दि जानेरो येथे ब्रिक्स शिखर परिषदेत व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली होती. 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी व्हिएतनामला भेटही दिली होती.