VIDEO: ‘फॅन बाबासाहेब दी…’ जर्मनीत गाजलं; रॅप सिंगर गिन्नी माहीचं गाणं ऐकून जर्मनही भारावले

| Updated on: Apr 14, 2021 | 2:23 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत ऐकवलं. (ginni mahi pay tribute to ambedkar from punjabi songs)

VIDEO: फॅन बाबासाहेब दी... जर्मनीत गाजलं; रॅप सिंगर गिन्नी माहीचं गाणं ऐकून जर्मनही भारावले
ginni mahi
Follow us on

नवी दिल्ली: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रसिद्ध रॅप सिंगर गिन्नी माहीने बाबासाहेबांवरील रॅप साँग थेट जर्मनीत ऐकवलं. जर्मनीतील एका कार्यक्रमात गिन्नीचं बाबासाहेबांवरील रॅप गाणं ऐकून तिथले अनिवासी भारतीय भारावलेच, पण जर्मन नागरिकही भारावून गेले. (ginni mahi pay tribute to ambedkar from punjabi songs)

गिन्नी माही ही रॅप सिंगर आहे. तिने बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलं आहे. बाबासाहेबांची शिकवण आणि त्यांचे कार्य गाण्याच्या माध्यमातून ती जगासमोर मांडत असते. विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीने किंवा भारतीय संगीताच्या अंगाने ती गाणं गात नाही. तर रॅप साँग गाण्यावर तिचा भर असतो. या रॅप गाण्यातूनच ती बाबासाहेबांचं कार्य आणि विचार पोहोचवत असते. आजच्या तरुणाईला बाबासाहेब अधिक कळावेत म्हणून तरुणाईला आवडत्या फॉर्ममध्ये ती गाणं गात असते.

जर्मनीत सर्व देशाचे प्रतिनिधी असलेल्या ग्लोबल मीडिया फोरममध्ये तिला गाणं गाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या संधीचा फायदा उचलत तिने ‘फॅन बाबा साहीब दी’ हे पंजाबी गाणं ठसक्यात गायलं. तिचं गाणं ऐकून भारतीय, जर्मनांसहित विविध देशाचे प्रतिनिधीही भारावून गेले.

माही काय म्हणाली?

गाणं सुरु होण्यापूर्वी माहीने तिचं मनोगत व्यक्त केलं. यावेळी ती स्वत: भारावून गेली होती. तिने हिंदीतच संवाद साधला. आज संपूर्ण भारत संविधानावर चालत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी आणि देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांनी कुटुंबाकडेही पाहिलं नाही. त्यांनी देशाच्या जडणघडणीत मोठं योगदान दिलं आहे. ते माझे आदर्श आहेत. संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेब जर्मनीत आले होते. ज्या जर्मनीत हा महापुरुष येऊन गेला. त्याच जर्मनीत यायला मिळालं ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे, असं ती म्हणाली. त्यानंतर तिने गाणं सुरू केलं आणि गाणं संपल्यावर जयभीम, जयभारत म्हणण्यासही ती विसरली नाही.

गीतकार कोण?

‘फॅन बाबा साहीब दी’ हे गाणं गुरपुरब है कांशीवाले दा या अल्बममध्ये आहे. हे गाणं पम्मा बखलापुरीया यांनी लिहिलं असून गिन्नी माहीने हे गाणं गायलं आहे. अल्बममध्ये एकूण सात गाणी आहेत. अल्बमवर संत शिरोमणी रविदास यांचा फोटो आहे.

गिन्नी माही कोण?

गिन्नी माहीचा जन्म 1999मध्ये पंजाबच्या जालंधरमधील अबदपुरा येथे झाला. ती चर्मकार समाजातील असून हंस राज महिला महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतलं आहे. ती पंजाबी लोकगीत गायिका आहे. त्याशिवाय रॅप आणि हिप-हॉप गायिकाही आहे. तिचं ‘फॅन बाबा साहीब दी’ आणि ‘डेंजर चमार’ ही दोन गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. तिचं मूळ नाव गुरकंवल कौर असून भीम गीतांसाठी ती प्रसिद्ध आहे. वयाच्या 11 व्या वर्षापासूनच तिने गायनास सुरुवात केली होती. तिने आजवर एक हजाराहून अधिक स्टेश शो आणि गायनाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. ती बाबासाहेबांना आदर्श मानते. तिच्या प्रत्येक गीतातून ती समानतेचा संदेश देत असते. (ginni mahi pay tribute to ambedkar from punjabi songs)

संबंधित बातम्या:

गाणं ऐकता ऐकता ‘त्याने’ संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं?, गाणं कोणतं होतं?; वाचाच!

मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!

‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का?

(ginni mahi pay tribute to ambedkar from punjabi songs)