
भारतामध्ये डाळ हा आहारातील एक प्रमुख घटक आहे. भारतामध्ये विविध प्रकारच्या डाळीचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न होतं. मात्र वाढती लोकसंख्या आणि मागणी व पुरवठा यातील समतोल टिकून राहावा, डाळीचे भाव नियंत्रणात राहावेत यासाठी आपण इतर देशांकडून देखील डाळींची आयात करतो. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर भारतानं देखील अमेरिकेतून आयात होत असलेल्या विविध डाळींवर 30 टक्के टॅरिफ लावून अमेरिकेला प्रत्युत्तर दिलं. आता सहाजिकच तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भारतानं असं का केलं? फक्त डाळींवरच टॅरिफ का लावण्यात आला? भारत अमेरिकेमधून कोण -कोणत्या डाळी आयात करतो, भारतानं लावलेल्या टॅरिफचा फटका कोणाला बसू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात.
भारत कोणत्या डाळी आयात करतो?
गेल्या काही वर्षांपासून अमेरिका हा भारतासाठी डाळींचा एक प्रमुख पुरवठादार देश म्हणून समोर आला आहे. पिवळ्या वाटाण्याची डाळ, मसूर डाळ, हराभरा डाळ इत्यादी डाळी भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. अमेरिकेकडून भारत जी डाळ आयात करतो , तिचा उपयोग हा केवळ खाण्यासाठीच नाहीतर प्रक्रिया उद्योगात देखील केला जातो. अमेरिका भारताला जी डाळ निर्यात करतो ती उत्तम गुणवत्तेची असते, मात्र तिची किंमत ही भारतीय डाळींच्या तुलनेत खूप जास्त आहे.
भारतानं अमेरिकेच्या डाळींवर टॅरिफ का लावला
भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं गेल्या ऑगस्ट महिन्यात भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला, त्यानंतर भारतानं देखील अमेरिकेच्या डाळीवर 30 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, डाळींवर टॅरिफ लावण्याचा निर्णय हा ऑक्टोबरच्या शेवटीच घेण्यात आला होता, मात्र त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरमध्ये करण्यात आली, अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळींवर टॅरिफ लावण्याचा बोललं जात आहे. तसेच यामुळे भारतामधील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा झाला आहे, सध्या परिस्थितीमध्ये भारतानं अमेरिकेतील डाळींवर 30 टक्के टॅरिफ लावला आहे.