
प्रत्येक तरुण, तरुणी आपल्या लग्नाचं स्वप्न पाहात असतात. विवाहासाठी ते खास प्लॅनिंग देखील करतात. मात्र लग्नाच्या दिवशीच दोघांपैकी एक जोडीदार अचानक लग्नाच्या मंडपातून गायब झाला तर दुसऱ्या जोडीदाराला काय वाटत असेल? त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल? असंच एक प्रकरण झारखंडमधल्या चतरा जिल्ह्यातून समोर आलं आहे. या प्रकरणात नव वधू सजून धजून लग्नासाठी आपल्या होणाऱ्या पतीची वाट पाहात होती, मात्र हे लग्न झालंच नाही, या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना खडगदा गावात घडली आहे. एका तरुण आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. त्यासाठी मंगल कार्यालय देखील बुक करण्यात आलं होतं. लग्नाचा दिवस उजडला.वधू विवाहासाठी तयार होती, ती लग्न मंडपात आपल्या भावी पतीची वाट पाहात होती. एवढ्यात तिचा होणारा पती सुनील कुमार हा वरात घेऊन वाजत गाजत लग्न मंडपात पोहोचला. थोड्याच वेळात लग्न होणार होतं, मात्र त्यानंतर एक घटना अशी घडली की, लग्नासाठी आलेले सर्व पाहुणे एक एक करून गायब होऊ लागले, त्यानंतर नवरदेव देखील गायब झाला, या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दशरथ प्रजापती यांनी आपल्या मुलीचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी सर्व व्यवस्था केली होती. वर पक्ष नाराज होऊ नये, यासाठी त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती, प्रचंड पैसा खर्च केला होता. वरात देखील लग्न मंडपात पोहोचली होती, मात्र त्याचवेळी अशी घटना घडली की, वर त्यानंतर त्याचे आई-वडील आणि लग्नासाठी आलेले इतर पाहुणे देखील लग्न मंडपातून एक एक गायब झाले. त्यामुळे हे लग्न होऊ शकलं नाही. या प्रकरणात आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान पोलीस तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, होणाऱ्या पतीने आपल्या वधूचा हात पाहिला, तिच्या हातावर त्याला पांढरे डाग दिसले, त्यामुळे त्याने लग्नाला नकार दिला. त्यानंतर वराचं अख्ख कुटुंबच लग्न मंडपातून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.