
मेलबर्न | 30 नोव्हेंबर 2023 : असं म्हणतात की वय हा फक्त एक आकडा आहे. तुम्ही वयाने मोठे झालात तरी मैत्री आणि प्रेम हे नातेसंबध कधी तुटत नाही. आता तर मैत्री आणि प्रेम याबाबत लोकांची विचारसरणी बदलत चालली आहे. नातेसंबंध जोडण्यापूर्वी वयाच्या फरकाकडे आता लक्ष देत नाहीत. उलट त्या व्यक्तीसोबत जडलेले नाते जपतात. असेच काहीसे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न भागात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेसोबत घडले. तिला ९१ वर्षीय असा व्यक्ती भेटला की जो पुढे तिच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न भागात राहणारी ही ३४ वर्षीय महिला बेकरी चालवते. पती आणि तीन मुलांसोबत ती रहाते. याच महिलेने सोशल माध्यमावर आपल्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केलाय. काही वर्षांपूर्वी तिच्या बेकरीमध्ये एक 91 वर्षीय वृद्ध व्यक्ती आली. त्या अनोळखी व्यक्तीने माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर मी त्याला कॉफीसाठी बसण्यास सांगितले. त्याचे व्यक्तिमत्व मैत्रीपूर्ण आणि करिष्माई असे होते. मी सहसा कधी कुणाला कॉफी ऑफर करत नाही. पण, त्याच्यासोबत बोलताना काही वेगळी अनुभूती आली. मी त्याला कॉफी आणि केक देऊ केला. सुरुवातीला त्याने नकार दिला. पण मी वारंवार विनंती केल्यावर त्याने होकार दिला असे ही महिला सांगते.
ऑस्ट्रेलियात राहणारी ही महिला पुढे सांगते, एका दृष्टीकोनातून पाहिले तर ही बाब निषेधार्ह वाटू शकते. कारण, तीन मुलांची आई अचानक एका अनोळखी व्यक्तीसोबत कॉफी प्यायला बसली. पण, दुसऱ्या दृष्टीकोनातून ते चुकीचे नव्हते. त्या व्यक्तीचे नाव ब्रायन आहे. मी त्यावेळी 34 वर्षांची तर तो 91 वर्षाचा… आमच्या वयात 57 वर्षांचा फरक होता. पण, वयात फरक असूनही ब्रायन आणि मी जवळचे मित्र झालो.
उन्हात बसून दिवसभराच्या बातम्यांबद्दल आम्ही बोलायचो. एकदा त्याला त्याच्याबद्दल विचारले तेव्हा तो एक पुस्तक लिहित आहे असे त्याने सांगितले. जीवनाच्या उत्कटतेने भारावलेला, संवाद साधण्यात आणि कल्पना व्यक्त करण्यात तो उत्कृष्ट होता. मला त्याची कंपनी खूप मनोरंजक वाटली. आमची कॉफी डेट संपताच मी ब्रायनला त्याचा नंबर विचारला. साधारणपणे मी इथपर्यंत कधीच जात नाही. पण, ही भेट विशेष वाटली आणि अशा प्रकारे एक सुंदर मैत्री सुरू झाली, असे या महिलेने नमूद केले आहे.
जेव्हा मी माझ्या पती आणि ब्रायनची ओळख करून दिली तेव्हा तोही त्याच्याकडे आकर्षित झाला. ब्रायनलाही आपल्या कुटुंबात आल्यासारखे वाटले. त्याची पत्नी आणि मुलगा दोघेही मरण पावले. त्यामुळे तो एकटाच राहत होता. त्याचे घर जवळच असल्यामुळे तो अधूनमधून त्याच्या स्कूटरवर कॉफी किंवा नाश्ता करायला आमच्याकडे यायचा.
कधी कधी येताना सोबत तो भूतकाळातील खजिना घेऊन येत असे. माझ्या मुलांना त्याच्या कथा ऐकायला खूप आवडायचे. ब्रायनबद्दल मला आवडत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे तो सखोल संभाषण, कोणत्याही गोष्टीचे विश्लेषण करू शकतो. त्याने भौतिक गोष्टींपेक्षा मानवी संबंधांवर अधिक जोर दिला. त्याचे हृदय खूप सकारात्मक आणि तरुण आहे असे ही महिला सांगते.
तो माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. ब्रायनशी माझी मैत्री होऊन चार वर्षे झाली आहेत. तो एक खरा मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे. चांगल्या आणि वाईट काळात मी कोणीवर तरी विश्वास ठेवू शकते असा हा मित्र आहे. कोरोना महामारी लॉकडाऊन दरम्यान पतीचा व्यवसाय बंद होता. अशा वेळी ब्रायनचा आधार आमच्यासाठी एखाद्या स्तंभासारखा होता. जेव्हा जीवनात कधी चढ उतार येतात तेव्हा मला ब्रायनची खूप गरज भासते.
आमचं कुटुंब आता मेलबर्नहून व्हिक्टोरियामधल्या एका छोट्या गावात शिफ्ट झालं. तरीही आम्ही ब्रायन याच्यासोबत अनेकदा बोलतो. मला त्याचे बोलणे नेहमीच आवडते. तो मला त्याच्या सुंदर बागेची चित्रे आणि आमच्या जुन्या परिसराची चित्रे पाठवतो. तर मी त्याला ग्रामीण जीवनाचा आनंद लुटणाऱ्या आमच्या मुलांची छायाचित्रे पाठवते असेही ही महिला सांगते.