मुंबईसाठी शिंदे गट 125 जागांवर ठाम, भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट; भाजपा काय निर्णय घेणार?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सध्या भाजपा आणि शिंदे गटात जागावाटप चालू आहे. असे असतानाच आता शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, हे समोर आले आहे.

BMC Election : राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राज्यात एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या सर्व महापालिकांमध्ये मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होईल तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुतीने हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जागावाटपावर चर्चा चालू आहे. याच जागावाटपाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गट एकूण 125 जागांवर ठाम असून यापेक्षा कमी जागा मिळाल्यास ती आपल्यासाठी धोक्याची घंटा असू शकते, असे मत शिंदे यांच्या शिवसेनेकडून व्यक्त केले जात आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
सूत्रांच्या माहितीनुसार आज (16 डिसेंबर) दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला 125 जागा हव्या आहेत, अशी भूमिका मांडली. 2017 साली शिवसेनेचे एकूण 84+4 असे एकूण 88 नगरसेवक होते. हे सर्व नगरसेवक धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे या सर्व जागांवर शिवसेनेचाच अधिकार आहे, असे शिवसेनेचे मत आहे. तसा दावा शिवसेनेने केला आहे.
शिंदे गट 125 जागांवर ठाम
भाजपने 2017 साली एकूण 82 जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा भाजपाच्या असतील. असेही मत शिंदे गटाने व्यक्त केले आहे. उर्वरित जागांवर वाटाघाटी करून निर्णय घ्यावा, असा प्रस्ताव शिंदे यांच्या पक्षाने ठेवला आहे. 100 पेक्षा कमी जागा घेणे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा असून 125 जागेवर शिवसेना पक्ष ठाम असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपा नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा आणि शिंदे गट पूर्ण ताकद लावणार आहे. तर आपली ताकद दाखवण्यासाठी ठाकरे गटदेखील पूर्ण शक्तीने निवडणूक लढवणार आहे. अशा स्थितीत शिंदे गटाने जागावाटपासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपा नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या दोन्ही पक्षांत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
