
हिमाचल प्रदेशात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे पर्यटननगरी मनाली अक्षरशः ठप्प झाली आहे. सलग बर्फवृष्टीमुळे मनाली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून मनालीकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही बंद आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र, आज मनालीजवळील राष्ट्रीय महामार्ग खुलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये हलके ऊन पडत असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने 27 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात पाऊस आणि बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
कुल्लू पोलिसांकडून सूचना जारी
कुल्लू पोलिसांनी मनालीकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांमध्ये पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, मनाली आणि आसपासच्या भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे शहरातील रस्ते आणि स्थानिक संपर्क मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. रस्ते पूर्ववत करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असले तरी त्यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पुन्हा बर्फवृष्टीची शक्यता
कुल्लू पोलिसांच्या माहितीनुसार, हवामान विभागाने 27 जानेवारी रोजी पुन्हा पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. जर या कालावधीत जोरदार बर्फवृष्टीमुळे पतलीकूहलपुढील मार्ग बंद झाला तर पर्यटक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनालीकडे जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत कुल्लू आणि आसपासच्या भागात जाणाऱ्या प्रवाशांनी वेगळ्या मार्गाचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कुल्लू जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
कुल्लू जिल्ह्यात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे तेथील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. 18 माइलजवळील रस्ता जरी खुला झाला असला तरी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाले असून अनेक वाहने बर्फात अडकली आहेत. मनालीमधून पर्यटकांना बाहेर पडणे कठीण होत चाललं आहे.
संपूर्ण कुल्लू जिल्ह्यात सध्या तब्बल 64 रस्ते बंद आहेत. यामध्ये रामपूर–आनी राष्ट्रीय महामार्गासह लेह–मनाली महामार्गाचाही समावेश आहे. त्यामुळे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.