पाकिस्तानपेक्षा मोठा धोका? या छोट्या देशात रचला जातो भारतावर हल्ल्याचा कट; खळबळजनक माहिती समोर

उल्फा-I या भारतात बंदी असलेल्या संघटनेने आमच्या तळांवर भारतीय लष्कराने ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. भारताने मात्र हा दावा फेटाळून लावलाय.

पाकिस्तानपेक्षा मोठा धोका? या छोट्या देशात रचला जातो भारतावर हल्ल्याचा कट; खळबळजनक माहिती समोर
India Drone Attack On ULFA
| Updated on: Jul 13, 2025 | 7:19 PM

India Drone Attack On ULFA :  भारतात बंदी असलेल्या ULFA या दहशतवादी संघटनेने मोठा दावा केला आहे. भारतीय लष्कराने म्यानमारच्या सीमेवर ड्रोनने हल्ले केले आहेत, असं या संघटनेनं म्हटलंय. सूत्रांच्या माहितीनुसार मात्र भारतीय लष्कराकडून असे कोणतेही ऑपरेशन राबवण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या कथित ड्रोन हल्ल्यात ULFA संघटनेचा लेफ्टनंट जनरल नयन असम हा मारला गेल्याचेही सांगितले जात आहे. तसा दावा ULFA या संघटनेने केला आहे. असे असतानाच आता म्यानमारपासून भारताला नेमका काय धोका आहे? असे विचारले जात आहे.

घनदाट जंगलात उल्फा-I  संघटनेचे सदस्य तळ ठोकून

उल्फा-I ही संघटना म्यानमारधील सगाईंग या भागात सक्रिय आहे. या भागात घनदाट जंगल आहे. याच गोष्टीचा फायदा घेत उल्फा-I या संघटनेचे सदस्य त्या भागात तळ ठोकून असून तिथे त्यांचे अनेक कॅम्प आहेत. हल्ल्यांची तयारी करणे, योजना आखणे, सदस्यांना प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्र जमा करणे अशा प्रकारची कामे या कॅम्पमधून होत असतात. भारतावर हल्ला करून याच कॅम्पमध्ये दहशतवादी लपून बसतात.

उल्फा-I संघटनेत 250 सदस्य

भारतीय सुरक्षा संस्थांनी न्यायाधिकरणाला सादर केलेल्या एका रिपोर्टनुसार उल्फा-I या संघटनेत एकूण 250 सदस्य आहेत. हे सर्व सदस्य म्यानमारमध्ये असलेल्या प्रमुख चार शिबिरांत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ही संघटना भारतातील अन्य विद्रोही समूहांच्या संपर्कात असते. या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडे साधारण 200 शस्त्र असल्याचे सांगितले जाते. या संघटनेशी संबंधित इतर संगटना भूतान या देशातही सक्रीय असल्याचेस सांगितले जाते.

नोव्हेंबर 1990 मध्ये संघटनेवर बंदी

भारत सरकारच्या रिपोर्टनसार उल्फा-I या संघटनेचे NSCN, कोरकॉम, NLFT, KYKL आणि PLA या विद्रोही संघटनांचे संबंध आहेत. या सर्व संघटना म्यानमारमध्ये आहेत. उल्फा-I ही संघटना सर्वात अगोदर नोव्हेंबर 1990 मध्ये बेकायदेशीर असल्याची घोषणा करण्यात आली होती. बंदी असली तरी तेव्हापासून या संघटनेचा विस्तार होत आलेला आहे.

म्यानमारमध्ये भारतविरोधी कट कसा रचला जातो?

उल्फा-I या संघनटेचा चीफ कमांडर परेश बरुआ याला बांगलादेशातून हाकलून लावण्यात आले होते. त्यानंतर तो म्यानमार-चीनची सीमा, चीनचा युन्नान प्रांत येथून त्याच्या कारवाया करतोय. ही ठिकाणं उल्फा-I या संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्यासाठी तसेच भारतीय लष्कराच्या कारवायांपासून बचाव करण्यासाठी वापरली जातात. उल्फा-I ही संघटना आसाम राज्यावर हल्ला करण्यासाठी म्यानमारमध्ये राहून कट रचते.

बड्या नेत्याचा खात्मा, 19 जण जखमी

दरम्यान, आता याच संघटनेने भारतीय लष्कराने आमच्या शिबिरांवर ड्रोनने हल्ले केल्याचा दावा केला आहे. यात आमच्या एका बड्या नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा या संघटनेने केला आहे. तसेच भारताच्या या कथित हल्ल्यांत 19 जण जखमी झाले आहेत, असा दावाही या संघटनेने केला आहे. भारतीय लष्कराने मात्र हा दावा फेटाळला असून आम्हाला या हल्ल्याची कल्पना नाही, असे लष्कराने म्हटले आहे.