
हरियाणाच्या हिसार येथील रहिवासी असलेली प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ‘ट्रॅव्हल विद जो’ नावाने चालणाऱ्या तिच्या यूट्यूब चॅनेलला 3.78 लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि ती सोशल मीडियावरील एक चर्चित चेहरा मानली जात होती. आता तिच्या अटकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वांना प्रश्न पडला आहे की ज्योती पाकिस्तानची गुप्तहेर कशी बनली? चला जाणून घेऊया…
ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्रामवर 1.33 लाख फॉलोअर्स, फेसबुकवर 3.21 लाख फॉलोअर्स आणि यूट्यूबवर जवळपास 4 लाख सब्सक्रायबर्स आहेत. ती मनाली, मसूरी, जैसलमेर, जयपूर आणि काश्मीरसारख्या भारतातील विविध पर्यटन स्थळांवर व्हीलॉग बनवून लोकप्रिय झाली होती. मात्र, तपास यंत्रणांचा दावा आहे की, ज्योतीचे पाकिस्तानात जाणे आणि तिथे काही खास व्यक्तींशी भेटणे संशयास्पद आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत ती पाकिस्तान उच्चायुक्ताच्या पार्टीत इतर भारतीय व्हीलॉगर्ससह दिसली होती. येथूनच तिच्या कथित हेरगिरीच्या कहाणीला सुरुवात झाली.
वाचा: अशी काढायची भारतीय लष्कराची रहस्ये, नंतर पाक गुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहोचवायची; कशी पकडली गेली ज्योती मल्होत्रा
‘महिन्याला 20-25 हजार कमावत होती ज्योती’
ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “माझी मुलगी दिल्लीत राहून महिन्याला 20-25 हजार रुपये कमावत होती. कोविडनंतर ती हिसारला परत आली होती.” त्यांचे म्हणणे आहे की, ज्योतीने केवळ ट्रॅव्हल व्हीलॉगिंगच्या आवडीपोटी यूट्यूब सुरू केले होते, पण आता तिच्यावर लावलेले आरोप धक्कादायक आहेत.
कशी बनली पाकिस्तानची हेर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवण्यासाठी आणि त्याच्या धोरणांचे समर्थन करणारा प्रचार करण्यासाठी परदेशी एजंट्सनी ज्योतीची निवड केली होती. असे सांगितले जाते की, पाकिस्तानातील तिचे वर्तन संशयास्पद होते आणि ती अशा काही व्यक्तींच्या संपर्कात होती, ज्यांना देशाच्या सुरक्षेसाठी धोका मानले जाते. आता ज्योतीवर देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याचा संशय आहे. तपास यंत्रणा हे शोधण्यात गुंतल्या आहेत की, तिचा कोणाशी संपर्क होता? तिने कोणती माहिती शेअर केली? आणि याच्या बदल्यात तिला कोणता आर्थिक लाभ मिळाला?