
Delhi Red Fort Car Blast : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत. विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली आहे. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कारमध्ये हा स्फोट झाला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.
दरम्यान, हरियाणातील फरिदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी नुकतेच एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली आहेत. सोबतच या डॉक्टरकडे दोन एके-47 बंदुका असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण 300 किलो आरडीएक्स पकडण्यात आलेले आहे. असे असतानाच आता दिल्लीत कारमध्ये स्फोट झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. हीच बाब लक्षात घेता पोलीस कारमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे स्फोट झाला की यामागे काही घातपात होता, याचा शोध घेतला जाणार आहे.