CJI:मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण…निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे वक्तव्य

CJI Bhushan Gavai: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेमुळेच आपण या सर्वोच्च पदापर्यंत पोहचू शकलो असे सरन्यायाधीश म्हणाले. नाहीतर नगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर बसून शिकणारा कोणताही मुलगा इतके मोठे स्वप्न पाहू शकला नसता अशा प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केल्या.

CJI:मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण...निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे वक्तव्य
सरन्यायाधीश भूषण गवई
| Updated on: Nov 21, 2025 | 9:52 AM

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी (CJI Bhushan Gavai) गुरुवारी सांगितले की ते वैयक्तिक जीवनात बौद्ध धर्माचे पालन करतात. पण खरंतर ते एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. ते सर्व धर्मांमध्ये विश्वास ठेवतात. सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशनकडून (SCSARA) आयोजित निरोप समारंभात भूषण गवई यांनी अनेक विषयांवर मन मोकळं केलं. देशातील न्यायपालिकेने आपल्याला बरंच काही दिल्याचे सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.

बीआर गवई 23 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. शुक्रवारी त्यांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस होता. गवई म्हणाले की मी बौद्ध धर्माचा अनुयायी आहे. पण माझा धर्माचा सखोल अभ्यास नाही. खरंतर मी धर्मनिरपेक्ष आहे. मी हिंदू धर्म, शिख धर्म, इस्लाम, ख्रिश्चन धर्म या सर्वांमध्ये विश्वास ठेवतो असे सरन्यायाधीश म्हणाले.

राज्य घटनेमुळे सरन्यायाधीशपदापर्यंत आलो

माझे वडील हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी होते आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्याकडूनच मी अनेक गोष्टी शिकलो. मी जेव्हा त्यांच्यासोबत अनेक राजकीय मंचावर, कार्यक्रमात जात होतो. तेव्हा त्यांचे काही मित्र मला दर्ग्यावर घेऊन जायचे. गुरुद्वारात न्यायचे. आम्ही पण जायचो, अशा अनेक आठवण त्यांनी यावेळी जागवल्या.

गवई म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेमुळेच आपण इतक्या मोठ्या पदावर पोहचलो. नाहीतर मला नाही वाटत की नगरपालिकेच्या शाळेत जमिनीवर शिकणारा मुलगा इतकी मोठी स्वप्न पाहू शकला असता. भारतीय राज्यघटनेचे चार आधारस्तंभ न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या विचाराप्रमाणे मी जगण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वोच्च न्यायालय हे सरन्यायाधीश केंद्रीत न्यायालय न राहता सर्व न्यायमूर्तींचे न्यायालय व्हावे असा मोलाचा विचार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

निवृत्तीनंतर त्यांचे मार्गदर्शन मिळेल

या निरोप समारंभात न्यायमूर्ती कांत यांनी विचार मांडले. सरन्यायाधीश गवई यांचा मानवीय दृष्टीकोन आपण पाहिला आहे. ते सर्वांमध्ये मिसळणारे आणि पाहुणचारासाठी उत्सुक व्यक्तिमत्व असल्याचे कौतुक त्यांनी केले. सेवानिवृत्तीनंतरही ते न्यायपालिका आणि संस्थांना मार्गदर्शन करतील. त्यांचा अनुभव या संस्थांसाठी संपत्ती, ज्ञानाचा ठेवा असल्याचे न्यायमूर्ती कांत म्हणाले.