
लोकसभा निवडणुकीचे 2024 चा निकाल लागण्यासाठी आता काही तास उरले आहेत. लोकं निवडणुकीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निवडणुकीचे निकाल आणि सोन्याचे भाव एकमेकांशी जोडलेले असतात, असा सर्वसाधारण समज आहे. विश्लेषक निकालाच्या आधारावर अनेकदा सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार याचा अंदाज लावत असतात. सोमवारी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 440 रुपयांनी घसरून 72,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. गेल्या आठवडाभरात २४ कॅरेट सोन्याच्या किमती १ टक्क्याने घसरल्या होत्या.
दिल्लीत 1 ग्रॅमचा भाव 7,226 रुपये, चेन्नईमध्ये 7,272 रुपये आणि मुंबईत 7,211 रुपये होता. कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, केरळ आणि पुणे येथेही किंमत 7211 रुपये होती. अहमदाबादमध्ये प्रति ग्रॅमचा भाव 7216 रुपये होता. गेल्या 10 दिवसांत सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले. त्यानंतर हळूहळू घट नोंदवली गेली. गेल्या वर्षभराचे विश्लेषण केले तर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. 20 मे 2024 रोजी ते शिखरावर पोहोचले. तेव्हा 1 ग्रॅम सोन्याचा भाव 7,516 रुपये होता.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम झाला. नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सोन्याचा भाव 35,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. जागतिक सुवर्ण परिषदेने असा अंदाज वर्तवला की कमकुवत आर्थिक वाढीमुळे पुढील सहा ते १२ महिन्यांत सोन्याची मागणी तात्पुरती कमी होऊ शकते. तरीही, विश्लेषकांचा असा विश्वास होता की भारतातील संरचनात्मक आर्थिक सुधारणा दीर्घकालीन मागणीला चालना देतील.
2019 च्या निवडणुकीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2020 मध्ये सोन्याचा भाव 48,651 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. 2021 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात सोन्याचे भाव या पातळीवर स्थिर राहिले. 2022 पर्यंत, किंमती आणखी वाढून 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. ही वाढ 2023 मध्येही कायम राहिली आणि किंमती 64,490 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्या.
मोतीलाल ओसवालचा सध्याच्या सोन्याच्या किमतींबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील २४ कॅरेट सोन्याच्या संभाव्य वरच्या किमतीचे लक्ष्य 81,000 रुपये प्रति 10 ग्रॅम केले आहे. मोतीलाल ओसवाल यांनी घसरलेल्या किमती दरम्यान सोने खरेदी करण्याची शिफारस केली आहे. सोन्याचा भाव 69,000 रुपयांपर्यंत घसरला तर त्यात गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ असेल, असे तो सुचवतो.