
भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कीने पाकिस्तानची मदत केली. एकीकडे भारत पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात लढत असताना पाकिस्तानला चिथावणी मिळेल असं कृत्य तुर्की आणि अझरबैजान या देशांनी केलं होतं. त्यानंतर भारतीयांच्या मनात तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांबद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे. भारतात सोशल मीडियावर तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या दोन्ही देशांमध्ये फिरायला जाणं आणि प्रवास करणं टाळावं, असं आवाहन सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सकडूनही केलं जातंय. सोशल मीडियावर या ट्रेंडने इतका जोर धरला आहे की त्याचे खरेच परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. भारतातील सर्वांत मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी MakeMyTrip (MMT) ने म्हटलंय की गेल्या एका आठवड्यात तुर्की आणि अझरबैजानसाठीच्या बुकिंगमध्ये तब्बल 60 टक्क्यांची घट झाली आहे.
इतकं नव्हे तर फ्लाइट कॅन्सलेशन म्हणजे विमानांची तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण 250 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर येत आहे. ‘मेक माय ट्रिप’ या कंपनीकडून सध्या तुर्की आणि अझरबैजानसाठी फ्लाइट बुकिंग पूर्णपणे थांबवली गेली नसली तरी कंपनीने एका निवेदनात म्हटलंय की, ‘आम्ही आमच्या देशाच्या आणि सैन्याच्या पाठिशी उभे आहोत. म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करतो की यावेळी या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा.’ इतकंच नव्हे तर या देशांसाठी सुरू असलेल्या सर्व जाहिराती आणि ऑफर्स थांबवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोकांना तिथं प्रवास करण्यापासून रोखता येईल.
EaseMyTrip या वेबसाइटवर तुर्कीसाठी 22 टक्के बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. तर अझरबैजानसाठी 30 टक्क्यांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. 9 मे रोजी जारी ट्रॅव्हल कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानंतर ही आकडेवारी समोर आली आहे. या कंपन्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटलंय की जर गरज नसेल तर तुम्ही या देशांमध्ये प्रवास करणं टाळावं. असं असलं तरी सध्या कंपन्यांनी या देशांसाठीचे बुकिंग पूर्णपणे रद्द केलेले नाहीत.
2014 मध्ये फक्त 4853 भारतीय पर्यटकांनी अझरबैजानला भेट दिली होती. ही संख्या 2024 मध्ये 2.43 लाखांपर्यंत वाढली. अझरबैजानच्या पर्यटनात पुढील दहा वर्षांत आणखी 11 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. सोशल मीडियावरील रील्स आणि इन्फ्लुएन्सर्सकडून केलं जाणारं प्रमोशन, यांमुळे पर्यटकांचा या देशांमध्ये ओघ वाढला आहे. तर दुसरीकडे 2014 मध्ये 1.19 लाख भारतीय तुर्कीला गेले होते. हीच संख्या 2024 मध्ये 3.30 लाखांवर पोहोचली होती.