
india maldive Row : भारत-मालदीव यांच्यात तणावाचे वातावरण असताना उच्चस्तरीय कोअर ग्रुपची चौथी बैठक शुक्रवारी दिल्लीत पार पडली. बैठकीत मालदीव आणि भारताच्या अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले की, दोन्ही बाजूंनी संरक्षण सहकार्य, विकास सहकार्य प्रकल्प, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली. मालदीवच्या लोकांना मानवतावादी आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मचे सतत कार्य चालू ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचाही आढावा घेतला गेला. यादरम्यान मालेमधून भारतीय लष्करी जवानांना माघार घेण्याच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली.
मालदीवने भारत सरकारला 10 मे पर्यंत माले येथे तैनात केलेल्या आपल्या लष्करी जवानांना माघार घेण्यास सांगितले आहे. मालदीवने भारताला यासाठी डेडलाईन दिली होती. आता मालदीवने दिलेली मुदत जवळ आल्याने भारत याबाबत काय निर्णय़ घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. वैमानिकांसह 80 हून अधिक भारतीय लष्करी जवान मालदीवमध्ये वैद्यकीय स्थलांतर आणि मानवतावादी मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले होते.
मालदीवच्या विनंतीनंतर भारत आपल्या लष्करी जवानांना माघारी बोलवत आहे. मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे सूचित करण्यात आले आहे की भारत सरकार 10 मे पर्यंत आपल्या लष्करी कर्मचाऱ्यांना माघार घेण्यास वचनबद्ध आहे.
भारताने गेल्या दोन महिन्यांत मालदीवमधून लष्करी जवानांच्या दोन तुकड्या माघारी बोलवल्या आहेत आणि त्यांच्या जागी नागरी तज्ञांची नियुक्ती केली आहे. मालदीवमध्ये गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी चीनशी मजबूत संबंध आणि भारतापासून दूर राहण्याची रणनीती स्वीकारली आहे. मुइज्जू हे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारतीय लष्करी सैनिकांना देशातून काढून टाकण्याबाबत त्यांनी जोर धरला आहे. निवडणुकीत देखील त्यांनी हाच मुद्दा पुढे केला होता.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची गेल्या वर्षी दुबईत भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये देखील याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर या कोअर ग्रुपच्या चार बैठका झाल्या. शुक्रवारी झालेल्या चौथ्या बैठकीत दोन्ही बाजूंनी परस्पर सोयीस्कर तारीख निश्चित करून उच्चस्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक माले येथे होणार असल्याचे मान्य केले.