
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात मोठी घोषणा केली, त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून काही दिवसांमध्येच दुसरा मोठा धक्का भारताला दिला, त्यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. येत्या 28 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांचं हे टॅरिफ अस्त्र त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावताना भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, असं म्हटलं होतं. मात्र भारतानं ट्रम्प यांच्या धमक्यांना न जुमानता रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. यावर स्पष्टीकरण देताना भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, भारताला रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे. अमेरिका आणि युरोपीयन युनियन देखील रशियाकडून वस्तुंची खरेदी करते.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आता चीन, भारत आणि रशिया यांची जवळीक वाढत आहे. चीनने अमेरिकेला भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफवरून चांगलंच सुनावलं होतं. तर दुसरीकडे रशियानं देखील भारताचं समर्थन केलं आहे. रशिया, चीन आणि भारत यांची जवळीक वाढत असल्यामुळे व्हाईट हाऊसचं टेन्शन वाढलं आहे. याबाबत पहिल्यांदाच व्हाईट हाऊसकडून कबुली देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात विश्वासू मानले जाणारे आणि व्हाइट हाउसचे ट्रेड सल्लागार पीटर नवारो यांनी रशिया, भारत आणि चीनच्या वाढत्या जवळकीवरून चांगलाच जळफळाट व्यक्त केला आहे. त्यांनी भारताला धमकी दिली आहे, जर भारताला अमेरिकेसोबत आर्थिक संबंध मजबूत करायचे असतील तर त्यांनी असं करू नये, असं पीटर नवारो यांनी म्हटलं आहे, ते फायनाल्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
मात्र दुसरीकडे आता भारतानं देखील अमेरिकेवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं दाललेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीन जवळ येताना दिसत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशियाकडून देखील भारताला समर्थन मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेवर दबाव निर्माण झाला आहे.