
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदीचं पाणी थांबवण्यात आलं आहे. सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. पाकिस्तानकडून भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देण्यात येत आहेत. तसचे त्यांच्या नेत्यांकडून विखारी वक्तव्य करण्यात येत आहेत.
सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत. कारण पाकिस्तानमधील जवळपास 80 टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबू आहे. एका रिपोर्टनुसार सिंधू जल वाटप करारावरील स्थगिती पुन्हा उठावी यासठी पाकिस्तान तीन पर्याय अजमावण्याची शक्यता आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा अंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) उपस्थित करण्याची शक्यता आहे.
दुसरा पर्याय म्हणजे 1960 मध्ये सिंधू पाणी वाटप करार झाला होता, तेव्हा जागतिक बँकेच्या देखरेखीखाली हा करार करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तान हे प्रकरण वर्ल्ड बँकेमध्ये देखील उपस्थित करण्याची शक्यता आहे. तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा यूनाइटेड नेशनमध्ये उपस्थित करू शकतो.
मात्र या तीनही ठिकाणी पाकिस्तानची डाळ शिजण्याची शक्यता खूपच कमी आहे. याबाबत माहिती देताना भारताचे केंद्रीय जल आयोगाचे माजी प्रमुख कुशविंदर वोहरा यांनी असं म्हटलं आहे की, भारतानं सिंधू नदी करार ज्या कारणांच्या आधारे स्थगित केला आहे, ती कारण खूप सशक्त आहेत, त्यापुढे पाकिस्तानचा निभाव लागणार नाही.
भारतानं केवळ सिंधू पाणी वाटप करारच स्थगित केला नाही तर अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पाकिस्तानात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाराताच्या या निर्णयांमुळे पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढला आहे.