
भारत आपल्या संरक्षण प्रणालीवर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. परकीय शत्रूंना धडा शिकवण्यासाठी भारत अनेक स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. याचाच एक भाग म्हणून संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) लवकरच एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी – लाँग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाईल (ET-LDHCM) ची चाचणी घेणार आहे. हे भारतातील सर्वात प्रगत हायपरसोनिक तंत्रज्ञान मानले जात आहे. हे क्षेपणास्त्र प्रोजेक्ट विष्णूचा भाग आहे. यामुळे भारताच्या शेजारील देश पाकिस्तान आणि चीनवर नियंत्रण ठेवणे भारतासाठी सोपे जाणार आहे. भारताचे ET-LDHCM क्षेपणास्त्र काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
भारताचे ET-LDHCM म्हणजे एक्सटेंडेड ट्रॅजेक्टरी – लाँग ड्युरेशन हायपरसोनिक क्रूझ मिसाईल हे असे क्षेपणास्त्र आहे जे ध्वनीच्या वेगापेक्षा 5 पट जास्त वेगाने उडू शकते. यायाची 2020 मध्येही यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी झाली होती. आता लवकरच पुढील चाचणीही पार पडणार आहे.
ET-LDHCM ची वैशिष्ट्ये काय आहेत?
ET-LDHCM हे क्षेपणास्त्र त्याच्या वेगासाठी ओळखले जाते. याचा ताशी वेग ११ हजार किमी प्रतितास असू शकतो. म्हणजेच हे १ सेकंदात ३ किमी पेक्षा जास्त अंतर कापू शकते. त्याच्या या वेगामुळे शत्रूचे रडार ते पकडू शकत नाहीत. तसेच याची रेंज ही १५०० किमी पेक्षा जास्त आहे. त्यामुळे ते भारतातून संपूर्ण पाकिस्तान आणि चीनमधील बऱ्याच भागावर हल्ले करु शकते.
ET-LDHCM क्षेपणास्त्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात स्क्रॅमजेट इंजिन आहे, जे हवेतून ऑक्सिजन घेऊन इंधन जाळते. यामुळे ते दीर्घकाळ हायपरसोनिक वेगाने उडू शकते. तसेच हे क्षेपणास्त्र कमी उंचीवर उडते आणि ते आपला मार्गही बदलू शकते, ज्यामुळे त्याचा वेध घेणे शत्रुसाठी सोपे काम नाही. त्यात अँटी-ऑक्सिडेशन कोटिंग आणि उष्णता-प्रतिरोधक साहित्य आहे, जे अति उष्णताही (२,०००°C पर्यंत) सहन करु शकते. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून ते डीआरडीओ आणि हैदराबादमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलात तयार करण्यात आले आहे. हे १०००-२००० किलो वजनाचे पेलोड्स वाहून नेण्यास सक्षम आहे.
ET-LDHCM चे मुख्य काम काय आहे?
ET-LDHCM हे क्षेपणास्त्र अनेक प्रकारच्या मोहिमांमध्ये वापरले जाऊ शकते. शत्रूची ठिकाणे लक्ष्य नष्ट करणे हे त्याचे काम आहे. तसेच ते शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकते, त्यामुळे चीन आणि पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे भारतासाठी सोपे होणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताला रशिया,चीन आणि अमेरिका या शक्तिशाली देशांच्या यादीत स्थान मिळाले आहे.