Indian Navy : भारत धावला इराणच्या मदतीला, खोल समुद्रात इंडियन नेवीचं स्पेशल ऑपरेशन, हायजॅक झालेल्या इराणच्या जहाजावरील सर्वांना वाचवलं
Indian Navy : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. मुंबईच्या किनाऱ्यापासून 3000 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात एकदम आतमध्ये स्पेशल ऑपरेशन केलय. त्यासाठी इंडियन एअर फोर्सची सुद्धा मदत घेण्यात आली.

भारतीय नौदलाने अरबी समुद्रात एक स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन केलं आहे. ‘अजिनी’ या इराणच्या मच्छीमारी जहाजाचं समुद्री डाकूंनी अपहरण केलं होतं. भारतीय नौदलाने समुद्री डाकूंच्या तावडीतून या जहाजाची सुटका करत सर्व 20 क्रू मेंबर्सची सुरक्षित सुटका केली. नौदलाचं हे जहाज सोमालियाच्या समुद्री डाकूंनी ऑक्टोंबर महिन्यात आपल्या ताब्यात घेतलं होतं. नौदलाने स्पेशल ऑपरेशन करत 48 तासांनी सर्व बंधकांची सुरक्षित सुटका केली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून या कारवाईसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रात जवळपास 3000 किलोमीटर अंतरावर हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. समुद्रा डाकूंच्या ताब्यातून हे जहाज सोडवण्यासाठी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षित सुटकेसाठी भारतीय नौदलाने इंडियन एअरफोर्सची सुद्धा मदत घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी ऑपरेशनसाठी नौदलाला दाद दिली. त्यांचं भरभरुन कौतुक केलं. हे ऑपरेशन खूप सावधता आणि आपसात चांगला समन्वय राखून पूर्ण करण्यात आलं.
“2 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईपासून 3000 किलोमीटर अंतरावर अरबी सागरात समुद्री डाकूंच्या ताब्यातून ‘अज़िनी’ जहाजाच्या सुटकेसाठी विशेष अभियान चालवण्यात आलं. 48 तासांच्या ऑपरेशननंतर सर्व 20 क्रू सदस्यांची सुटका करण्यात आली. या यशस्वी ऑपरेशनसाठी मी भारतीय नौदलाला शुभेच्छा देतो” असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
एअर फोर्सने काय मदत केली?
“इंडियन एअर फोर्सकडून वेळेवर मदत मिळाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या समुद्री डाकूंच्या ताब्यातील जहाज शोधून काढता आलं. डाकूंना रोखणं आणि क्रू मेंबर्सची सुरक्षित सुटका यातून भारतीय नौदलाची ऑपरेशनल आणि समुद्री संकटांचा सामना करण्याची क्षमता दिसून येते. आमच्या शूर जवानांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की, भारताकडे लोकांचे प्राण वाचवण्याची, समुद्री सुरक्षा कायम ठेवण्याची आणि संपूर्ण हिंद महासागर क्षेत्राची स्थिरता सुनिश्चित ठेवण्याची क्षमता आणि इरादा आहे” असं राजनाथ यांनी म्हटलं आहे.
भारतीय नौदलाची कमीत कमी एक युद्धनौका या भागात तैनात असते
उत्तर-पूर्व सोमालियाचं बंदर बायला आणि हाफुन येथून ‘अजिनी’ हे इराणचं मच्छीमारी जहाज हायजॅक करण्यात आलं होतं. समुद्री डाकूंनी हे जहाज आपल्या ताब्यात घेतलं होतं. समुद्री डाकूंच्या या त्रासाची कल्पना असल्याने भारतीय नौदलाची अदनच्या खाडीत सतत पेट्रोलिंग सुरु असते. अशा मिशनसाठी भारतीय नौदलाची कमीत कमी एक युद्धनौका या भागात तैनात असते.समुद्री मार्गाने होणारा भारतीय व्यापार सुरक्षित ठेवणं, समुद्री जहाजांवर काम करणाऱ्या खलाशांमध्ये विश्वास कायम ठेवणं आणि समुद्री डाकूंचे हल्ले रोखणं हा या पेट्रोलिंगमागे उद्देश आहे.