रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
Indian Railway Compensation Rules: काल परवाच रेल्वेतील चादर अंगावर घेतलेले तीन प्रवाशी कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरून नेल्यास काय शिक्षा होते याची चर्चा रंगली आहे. दंडासह किती वर्षाचा तुरुंगवास होतो याविषयीचे सर्चिंग सुरू झाले.

रेल्वेत AC कोचमधून प्रवास करताना ब्लँकेट्स, चादर, उशी प्रवाशाला देण्यात येते. थंडी वाजू नये यासाठी त्याचा वापर केल्या जातो. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी या वस्तू देते. यामुळे रात्री झोपताना प्रवाशाला त्रास होत नाही. पण काही प्रवासी या सुविधेचा चुकीचा वापर करतात. ते ट्रेनमधून ब्लँकेट, बेडशीट वा चादर चोरी करतात. दोन दिवसांपूर्वीच तीन प्रवाशी रेल्वेची चादर गुंडाळत रेल्वे स्टेशन बाहेर एका दुकानावर थांबलेले असताना कॅमेऱ्यात कैद झाले आणि चर्चांना पेव फुटले. असा प्रकार केल्यास संबंधित प्रवाशाला 5 वर्षांची शिक्षा आणि मोठा दंड भरावा लागतो.
एसी कोचमध्ये मिळते सुविधा
भारतीय रेल्वेच्या AC कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान बेडशीट, ब्लँकेट, उशी देण्यात येते. रात्रीच्यावेळी प्रवासी दूरचा टप्पा गाठत असल्याने, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने त्यांच्या आरामासाठी ही सुविधा देण्यात येते. रेल्वेचे सामान प्रवासानंतर तिथेच सोडणे आवश्यक असते. पण काही प्रवासी या वस्तू बॅगमध्ये भरून घरी नेतात. रेल्वे नियमानुसार ही बाब चुकीची आहे. रेल्वेच्या नियमानुसार अशा प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात येते.
5 वर्षांचा तुरुंगवास
रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) अधिनियम, 1966 अंतर्गत कठोर कारवाई होते. चादर, ब्लँकेट, उशी अथवा इतर मालमत्ता चोरताना प्रथम पकडल्यास संबंधित व्यक्तीला कमाल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होतो. प्रवाशाला 1 हजारांचा दंड होऊ शकतो. दंडाची रक्कम वाढू सुद्धा शकते. काही प्रकरणात दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतात. रेल्वे सुरक्षा दल आता ट्रेनमध्ये नियमीतपणे अचानक तपासणी करतात. तर रेल्वे थांबल्यावर संबंधित एसी डब्याची तपासणी होते. जर प्रवाशी वस्तू चोरी करून नेताना आढळल्यास कारवाई होते.
चोरीची भरपाई कुणाकडून?
रेल्वेच्या नियमानुसार, डब्यातील बेडरोल, चादर, उशी, ब्लँकेटची जबाबदारी ही कोच अटेंडंट अथवा बेडरोल पुरवठा करणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीची असते. डेपोकडून ठराविक संख्येत हे साहित्य घेतो. त्याची रीतसर नोंद होते. प्रवास संपल्यानंतर ट्रेन यार्डमध्ये उभी राहते. लिनन विभाग एसी डब्यातील साहित्याची, वस्तूंची संख्या पुन्हा मोजते. या तपासणीत चादर, उशी अथवा टॉवेल कमी आढळल्यास, या वस्तूंची किंमत संबंधित अटेंडेंटच्या पगारातून वसूल होते.