
रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. अनेकदा वेटिंग तिकीट (Waiting List) किंवा आरएसी (RAC) तिकीट असेल तर ते कन्फर्म होणार की नाही, या काळजीमुळे अनेक प्रवासी चिंतेत असतात. हीच अडचण ओळखून भारतीय रेल्वेने रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याच्या वेळेत मोठे बदल केले आहेत. भारतीय रेल्वेने आपल्या आरक्षण प्रणालीत एक अत्यंत महत्त्वाचा बदल केला आहे. रेल्वेने आता पहिला रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याची वेळ बदलली आहे. याचा थेट फायदा अशा प्रवाशांना होणार आहे.
पूर्वी अनेकदा गाडी सुटण्याच्या ४ तास आधी चार्ट लागायचा. ज्यामुळे प्रवाशांची खूप धावपळ व्हायची. आता रेल्वेने गाड्यांच्या वेळेनुसार चार्ट तयार करण्याचे नवीन नियम लागू केले आहेत. रेल्वेने गाड्या सुटण्याच्या वेळेनुसार तीन मुख्य भाग केले आहेत.
सकाळच्या गाड्या (सकाळी ५:०१ ते दुपारी २:००): जर तुमची ट्रेन सकाळी ५ ते दुपारी २ या वेळेत सुटणार असेल, तर तिचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंत तयार केला जाईल. यामुळे प्रवाशांना रात्री झोपण्यापूर्वीच आपले तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे समजेल.
दुपार आणि रात्रीच्या गाड्या (दुपारी २:०१ ते रात्री ११:५९): ज्या गाड्या दुपारी २ नंतर आणि रात्री १२ च्या आधी सुटतात, त्यांचा चार्ट आता निर्धारित वेळेपेक्षा आध तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून प्रवाशांना किमान ४ ते ६ तास आधी माहिती मिळेल.
मध्यरात्रीच्या गाड्या (रात्री १२:०० ते पहाटे ५:००): या गाड्यांचा चार्ट आता गाडी सुटण्यापूर्वी किमान १० तास आधी तयार केला जाईल. म्हणजेच जर तुमची गाडी रात्री २ वाजता असेल, तर संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच तुम्हाला तिकीट स्टेटस समजणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रवासी दूरवरून रेल्वे स्टेशनवर येतात. जर त्यांना स्टेशनवर आल्यावर समजले की त्यांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही, तर त्यांची मोठी गैरसोय होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना यामुळे खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना बॅकअप प्लॅन तयार करण्यासाठी वेळ मिळावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या रेल्वेची ८७ टक्के तिकिटे ही IRCTC च्या माध्यमातून ऑनलाइन बुक केली जातात. ऑनलाइन तिकीट जर चार्ट तयार होईपर्यंत वेटिंगमध्ये राहिले, तर ते आपोआप रद्द होते आणि पैसे खात्यात जमा होतात. चार्ट लवकर तयार झाल्यामुळे प्रवाशांना त्यांचे पैसे लवकर परत मिळण्याची प्रक्रिया सुरू होण्यास मदत होईल, अशीही माहिती रेल्वेने दिली आहे.