
देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. तांत्रिक बिघाड, पायलट आणि क्रू कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सरकारी नियमांमुळे कंपनीने गुरुवारी देशभरात १०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. गेल्या दोन दिवसांत इंडिगोची २०० हून जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. अनेकदा फ्लाईटचे उड्डाण खूप उशीर झाल्याचे समोर आहे. यामुळे दिल्ली, हैदराबाद, बेंगळूरु, अहमदाबाद अशा मोठ्या विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विमान ऐनवेळी रद्द झाल्याने त्यांना तासनतास विमानतळावर थांबावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवार आणि गुरुवार असे गेल्या दोन दिवसांपासून इंडिगोची २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही विमानांना खूप मोठा उशीर झाला. यामध्ये गुरुवारी १०० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. यानुसार बंगळूरुतून ४२ इंडिगोची विमाने रद्द करण्यात आली. तर दिल्ली ३८, अहमदाबाद २५, हैदराबाद १९, कोलकाता १०, इंदूर ११ आणि सुरत ८ इतक्या इंडिगोच्या फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच सध्या विमानतळांवर चेक-इन सिस्टीम वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना मॅन्युअल (Manual) पद्धतीने चेक-इन करावे लागले. यामुळे प्रत्येक प्रवाशांना २५ ते ४० मिनिटे अतिरिक्त वेळ लागत होता. अनेक प्रवाशांना शेवटच्या क्षणी विमान रद्द झाल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याचे पाहायला मिळत आहे. इंडिगोची सेवा कोलमडल्यामुळे इतर कंपन्यांच्या विमानांची मागणी वाढली. त्यामुळे विमानाच्या तिकीटांचे दर वाढले आहेत. सध्या दिल्ली-मुंबईसारख्या मार्गांवर तिकिटांचे दर २० हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोच्या अनेक विमानांची उड्डाणे रद्द आणि उशीर होण्यामागे एक निवदेन जारी केले आहे. यात त्यांनी उड्डाणे विस्कळीत होण्याची अनेक कारणे नमूद केली आहेत. सध्या इंडिगो कंपनीत विमानाचे उड्डाण करण्यासाठी पुरेसे पायलट आणि केबिन क्रू उपलब्ध नाहीत. सरकारने नुकतेच वैमानिकांसाठी विश्रांतीचे नियम बदलले आहेत. त्यामुळे आता वैमानिकांना जास्त सुट्टी देणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे शिफ्टमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. तसेच चेक-इन आणि इतर कामांमध्ये तांत्रिक बिघाड होत आहे. ज्यामुळे विलंब होत आहे.
इंडिगोने या गैरसोयीबद्दल निवेदनात माफी मागितली आहे. तसेच पुढील ४८ तासांत संपूर्ण सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, DGCA ने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून इंडिगोला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.