
Indus Water Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार रद्द केला आहे. भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी थांबवले जात आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरमधील चार जलविद्युत योजनांवर वेगाने काम सुरु आहे. तसेच अन्य दोन योजनांचा आराखड्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्याचा परिणाम पाकिस्तानवर होणार आहे. पाकिस्तानमध्ये जलसंकट निर्माण होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १९६० पासून कार्यरत असलेला सिंधू जलकरार भारताने स्थगित केला होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या योजनांवर वेगाने काम सुरु आहे, त्यात १००० मेगावॅटचा पाकल दुल, ६२४ मेगावॅटचा किरु प्रकल्प, ५४० मेगावॅटचा क्वार आणि ८५० मेगा वॅटचा रतले प्रकल्पाचा समावेश आहे. या सर्व योजना चिनाब नदीवर आहेत. या सर्व योजनांच्या कामांना वेग घेतला असून पूर्ण करण्याची डेडलाइन कमी करण्यात आली आहे. या योजना आता मे २०२६ ते जुलै २०२८ दरम्यान पूर्ण करण्यात येणार आहे.
रतले जलविद्युत प्रकल्प मे २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रतले जलविद्युत पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही कंपनी राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ (JKSPDC) यांच्या संयुक्त उपक्रम म्हणून कार्यरत आहे.
ऊर्जा मंत्रालयाने वुलर बॅरेज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळबुल नेव्हिगेशन प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे मूल्यांकन देखील सुरू केले आहे. यापूर्वी ही योजना पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपांमुळे १९८७ मध्ये स्थगित केली होती. परंतु २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा पाणी करार स्थगित केल्यानंतर भारताने या प्रकल्पांशी संबंधित माहिती शेअर करणे थांबवले आहे. यामुळे वुलर बॅरेजला चालना मिळणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला लवकरच मंजुरी मिळणार आहे. सन २०२६ मध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.