‘सिंधू पाणी करार’ ही जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक, जेपी नड्डांचा गंभीर आरोप

सिंधू पाणी करारावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

सिंधू पाणी करार ही जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक, जेपी नड्डांचा गंभीर आरोप
nadda-and-nehru
| Updated on: Aug 18, 2025 | 6:49 PM

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता. यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या करारावर 19 सप्टेंबर 1960 रोजी कराची येथे भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती. मात्र आता या करारावरून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 1960 चा सिंधू पाणी करार हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक होता, यात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी राष्ट्रीय हितांचा बळी देण्यात आला होता. आपल्याला हे माहित असले पाहिजे की, पंडित नेहरूंनी सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली तेव्हा त्यांनी सिंधू खोऱ्यातील 80 टक्के पाणी पाकिस्तानला दिले होते आणि भारताला फक्त 20 टक्के वाटा मिळाला होता.

जवाहरलाल नेहरूंचा हा निर्णय भारताच्या जलसुरक्षा आणि राष्ट्रीय हिताला धोका निर्माण करणारा होता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी भारतीय संसदेतील सदस्यांसोबत सल्लामसलत न करता हा निर्णय घेतला होता. हा करार सप्टेंबर 1960 मध्ये झाला होता, कराराच्या 2 महिन्यांनंतर तो संसदेत फक्त दोन तासांसाठी चर्चेसाठी ठेवला होता.

पुढे बोलताना जेपी नड्डा म्हणाले की, ‘ही इतकी मोठी चूक होती की पंडित नेहरूंच्या स्वतःच्या पक्षाच्या खासदारांनीही याला तीव्र विरोध केला होता, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काँग्रेसचे नेते अशोक मेहता यांनी या कराराची निंदा केली होती आणि हा करार देशासाठी ‘दुसरी फाळणी’ असल्याचे म्हटले होते असंही नड्डा यांनी म्हटलं आहे.

पंडित नेहरू यांनी पक्षातील सहकाऱ्यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता, त्यांनी सिंधू पाणी करार भारतासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यांनी उलट बाटलीभर पाण्याचे विभाजन? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला होता असंही जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे.