
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, आज युद्धाचा 10 दिवस आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरू आहेत, या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे, इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये आता अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आज आता इराणकडून आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करण्यात आली आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मध्य पूर्वेतून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इस्त्रायलवर चांगलेच नाराज झाले आहेत. युद्ध सुरू असताना इस्त्रायलने इराणमधील तेला साठ्यांना लक्ष्य केलं. यावरून अमेरिकेनं चांगलाच संताप व्यक्त केला आहे. इस्त्रायलने एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको, यामुळे युद्ध आणखी भडकेल अशा शब्दात अमेरिकेनं इस्त्रायला सुनावलं आहे. तेलाच्या साठ्यांवर जर हल्ला केला तर त्याचा त्रास हा सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो असंही अमेरिकेनं इस्त्रायला म्हटलं आहे.
एका रिपोर्टानुसार इस्रायलकडून इराणच्या तेल डेपोला लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला इस्त्रायलकडून एवढ्या भीषण हल्ल्याची अपेक्षा नव्हती. हे हल्ले चुकीचे आहेत, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. तर अमेरिकेकडून आलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचं इस्त्रायने म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि इस्त्रायल आमने-सामने आल्याचं चित्र आहे.
युद्धाचा दहावा दिवस
आज युद्धाचा दहावा दिवस आहे. गेल्या दहा दिवसांपासून मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये तीनही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. सर्वाधिक नुकसान हे इराणचं झालं आहे. मात्र इस्त्रायलकडून आता इराणच्या तेल साठ्यांवर हल्ला करण्यात आल्यानं अमेरिका चांगलीच नाराज झाली आहे.