इस्रोच्या जीसॅट-31चं फ्रेंच गयानाहून यशस्वी प्रक्षेपण

इस्रोच्या जीसॅट-31चं फ्रेंच गयानाहून यशस्वी प्रक्षेपण

फ्रेंच गयाना : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) 40 व्या संप्रेषण उपग्रह जीसॅट-31 चे बुधवारी रात्री 2 वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. युरोपियन कंपनी एरीअनस्पेसच्या एरीअन रॉकेटकडून फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण स्थळावरुन भारतीय वेळेनुसार रात्री 2 वाजून 31 मिनिटांनी या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपणाच्या 42 मिनिटांनंतर 3 वाजून 14 मिनिटांनी हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थपित झाला. जीसॅटच्या प्रक्षेपणासाठी एरीअनस्पेसच्या एरीअन-5 रॉकेटची मदत घेण्यात आली. इस्रोनुसार, जीसॅट-31 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहिल. भारताने याआधीही अनेक उपग्रह या प्रक्षेपण स्थळावरुन प्रक्षेपित केले आहेत.

जीसॅट-31 चे वजन 2535 किलोग्राम आहे. हा भारताच्या जुन्या संप्रेषण उपग्रह इनसॅट-4 सीआरची जागा घेईल. हा उपग्रह भू-स्थिर कक्षेत कु-बँड ट्रान्सपॉन्डर क्षमता वाढवेल. एरीअन-5 रॉकेट जीसॅटसोबतच सौदी जियोस्टेशनरी सॅटेलाईट 1/हेलास-4 सॅट या उपग्रहालाही आपल्या सोबत घेऊन गेला आहे.

व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजीटल उपग्रह न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस, सेल्युलर बॅक हॉल संपर्क आणि बऱ्याच सेवांमध्ये या जीसॅटचा वापर केले जाईल, अशी माहिती इस्रोने दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *