रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?
जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. राहुलने आपली पत्नी आणि तीन मुलींना मारलं. हत्येनंतर राहुलचे थंड डोक्याचे वागणे धक्कादायक आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केलाय.

राजस्थानच्या जयपूरमधून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करधनी भागात हे भयानक हत्याकांड घडलं. राहुल झा नावाच्या इसमाने त्याची पत्नी आणि तीन मुलींवर दगडाने वार करून त्यांची हत्या केली. या हत्येची माहितमिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांच्या डोक्यावर आणि शरीरावर दगडाने मारल्यामुळे जखमा होत्या. मात्र चोघींना संपल्यावर आरोपी असं वागत होता, जणू काही घडलंच नाही. त्याचं वागणं अतिशय हैराण करणारं आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, पत्नी आणि तीम मुलींना संपवल्यावरही राहुलने त्याची रोजची दिनचर्या कायम ठेवली. आधी दूधवाल्याकडून दूध घेतलं, त्यानंतर आपल्या म्हाताऱ्या वडिलांसाठी चहा करून त्यांना तो पाजला देखील. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला अन् फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे 10 वाजता कर्धनी परिसरातील गोविंद वाटिका येथील प्लॉट क्रमांक A-169 मध्ये चार जणांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. ते ऐकताच पोलिसांचं पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं. घराची झडती घेतली असता पहिल्या मजल्यावरील एका खोलीत राहुल यांच्या पत्नी गीता झा यांचा मृतदेह आढळून आला. तर त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह तळमजल्यावरील दोन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळले. मुलींच वय 23, 18 आमि 14 असं होतं.
मध्यरात्रीच्या सुमारास हाँ प्रकार घडल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासानुसार, चौघीही गाढ झोपेत असताना आरोपीने त्यांच्यावर दगडाने हल्ला केला. डोक्यावर आणि चेहऱ्यावर करण्यात आलेले वार इतके गंभीर होते की, चौघींचाही मृत्यू झाला. या हत्याकांडात वापरण्यात आलेला दगडही पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हत्येनंतर राहुलच्या वागण्याने वाढलं गूढ
आपलीच पत्नी आणि मुली, चौघींच्या हत्येनंतर सकाळच्या घटनाक्रमाने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढलं आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सकाळी सुमारे 7 वाजता राहुलने दूधवाल्याकडून दूध घेतलं. त्यानंतर त्याने आपल्या वृद्ध वडिलांसाठी चहा बनवला. वडिलांना चहा दिल्यानंतर तो घराबाहेर पडला. त्यानंतर त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांकडून आता संशयित आरोपी राहुल झा याचा शोध घेतला जात आहे.
डीसीपी वेस्ट प्रशांत किरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास सुरू आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे पोलिस कसून शोधत आहेत. तपासादरम्यान राहुल झा याच्या कामकाजासह त्याच्या अलीकडील हालचालींबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली. राहुल शेअर ट्रेडिंगचे काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो गुजरातहून जयपूरला परतला होता. तर राहुलची पत्नी गीता झा घराच्या पहिल्या मजल्यावर बुटीक चालवत होती. त्यांची मोठी मुलगी नंदिनी शिक्षणासोबतच खासगी नोकरीही करत होती.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात आर्थिक व्यवहाराशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घटनेच्या अवघ्या तीन दिवस आधी राहुलने शेजारी राहणाऱ्या एका महिलेकडून 25 हजार रुपये उधार घेतले होते. या पैशांचा हत्याकांडाशी काही संबंध आहे का, याचाही तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक वादाच्या दिशेनेही तपास
सध्या पोलिसांकडून आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद यांसह विविध बाजूंनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. कुटुंबातील परिस्थिती, राहुलच्या अलीकडील हालचाली तसेच त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. त्या चौघींचे मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळून आले असून, हत्येसाठी दगडाचा वापर करण्यात आल्याचे समोर आलं. त्यामुळे घटनाक्रमातील प्रत्येक बाब एकमेकांशी जोडण्यावर पोलिसांचा तपास केंद्रित आहे.