“आमचा पूर्ण पाठिंबा…” पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाहांना फोन

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळावा आणि सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

आमचा पूर्ण पाठिंबा... पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाहांना फोन
amit shah rahul gandhi
| Updated on: Apr 23, 2025 | 11:36 AM

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये काल (२२ एप्रिल) भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत गुप्तचर विभाग, गृहसचिव, गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक हे उपस्थित होते. या दहशतवादी हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून कठोर शब्दांत निषेध केला जात आहे. आता या हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. यावेळी विरोधी पक्षांकडून या कठीण परिस्थितीत सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी नुकतंच त्यांच्या ट्वीटरवरुन दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. “मी नुकतंच गृहमंत्री अमित शाह, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि जम्मू-कश्मीर काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष तारिक कर्रा यांच्याशी पहलगाम येथील हल्ल्याबाबत संवाद साधला. मी सध्याच्या परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. तसेच पीडित कुटुंबांना न्याय मिळावा असे मत राहुल गांधींनी व्यक्त केले. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल”, असे राहुल गांधी म्हणाले.

त्यासोबतच राहुल गांधींनी ट्वीटरवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरकार ठोस पावलं उचलावीत, अशी मागणी केली आहे. “जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना जीव गमवावा लागला आणि अनेक लोक जखमी झाले, ही बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. मी मृत व्यक्तींच्या कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी आशा करतो. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देशाची एकजूट आहे. सरकारने जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या पोकळ दाव्यांऐवजी आता जबाबदारी स्वीकारून ठोस पाऊले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही आणि निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

अमित शाह पहलगाममध्ये दाखल

दरम्यान पहलगाममधील हल्ल्याचे गांभीर्य ओळखून गृहमंत्री अमित शाह हे तातडीने पहलगाममध्ये रवाना झाले. ते आज श्रीनगरला पोहोचले असून त्यांनी जखमी झालेल्या कुटुंबांची भेट घेतली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) दौरा मध्येच थांबवून तातडीने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. “या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे. तो अधिक मजबूत होईल. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले होते.