पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून घटनेचा निषेध

आता या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोन महाराष्ट्रातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून घटनेचा निषेध
| Updated on: Apr 22, 2025 | 9:21 PM

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दिलीप डिसले आणि अतुल मोने या महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे.

या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध केला आहे. “पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे पाकड्यांना सोडणार नाही. ज्या निरपराध लोकांचा यात जीव गेलाय, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही”, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल

“पहलगाममध्ये हा सर्वात मोठा हल्ला झालेला आहे. मी याचा निषेध करतो. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाहांना तिथे पाठवलं आहे. मी इतकंच सांगतो की निरपराध पर्यटकांना मारण्यात कोणती मर्दानगी आली आहे. हा भ्याड हल्ला आहे. हे पाकडे सर्जिकल हल्ल्यानंतर बिळात लपले होते. त्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. या पाकड्यांचा बदला अॅक्शनला रिअॅक्शन मिळेल. याला करारा जवाब मिळेल. कारण हा भारत देश आहे आणि भारताचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे पाकड्यांना सोडणार नाही. ज्या निरपराध लोकांचा यात जीव गेलाय त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा समावेश आहे. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो, तिने मला सांगितले की माझ्यासमोर माझ्या वडिलांना आणि काकांना नाव विचारुन गोळ्या घातल्या. अशाप्रकारे भ्याड हल्ला केला. ते भेदरलेल्या अवस्थेत होते. मी त्यांना सांगितलं की स्वत: गृहमंत्री तिथे पोहोचतात. महाराष्ट्र सरकारच्या वतीनेही संपर्क सुरु आहे. मी स्वत: त्यांच्याशी बोललो. त्यांना सर्व मदत मिळेल. तसेच त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्याची व्यवस्था केली जाईल”, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले