ही तर सिया, मुस्कानपेक्षाही डेंजर, नवरा ऑस्ट्रेलियात गेल्याचा दोन वर्ष बनाव, अखेर एका प्रश्नाने… ‘दृश्यम’ही फिका पडेल अशी मर्डर मिस्ट्री
Jamnagar Cyanide Murder Case : प्रेम, विश्वासघात आणि थरकाप उडवणारा खून! जामनगरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत रचला मृत्यूचा कट; दोन वर्षे पती ‘ऑस्ट्रेलियात’ असल्याचे सांगून सर्वांची केली दिशाभूल. असा उघड झाला तिचा गुन्हा ..

गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून थरारक कट रचल्याचा आरोप आहे. पतीला दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पाजून मारलं. त्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने पतीचा मृतदेह तब्बल 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात पुरला. हाईट म्हणजे, आपल्या पतीचा काटा काढलाय हे लपवण्यासाठी सतत 2 वर्ष ती महिला सासरच्या लोकांशी खोट बोलत राहिली. मात्र दिराच्या एका प्रश्नाने अखेर दोन वर्षांनी हे रक्तरंजित सत्य उघड झालं. ‘दृश्यम’ चित्रपटालाही लाजवेल अशी भयानक कहाणी आणि खुनाचा हा थरार पाहून सगळेच हादरले, पोलीसही अगदी अवाक् झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पृथ्वी हिचे निलेश मनसुखभाई कचेटिया याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या या नात्यात पती जिग्नेश अडथळा ठरत असल्याने पृथ्वी आणि तिच्या प्रियकराने त्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्या दोघांनी मिळूनच जिग्नेशला दारूमध्ये सायनाइड मिसळून पाजलं, ज्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू झाला. मात्र हा खून लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी दरेड परिसरातील एका भाड्याच्या कारखान्यात खोल खड्डा खणून तिथे जिग्नेशचा मृतदेह पुरला.
“पती ऑस्ट्रेलियात आहे” दोन वर्षे एकच खोटं…
जिग्नेशच्या हत्येनंतर संशय टाळण्यासाठी आरोपी महिला पृथ्वीने सासरच्या मंडळींसमोर एक बनाव रचला. जिग्नेश कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला असून, ज्या कंपनीत तो काम करतो तिथे मोबाईल वापरण्यास मनाई असल्याचं ती वारंवार सांगत होती. या कथित खोट्या गोष्टीवर विश्वास ठेवत कुटुंबीय जवळपास दोन वर्षे जिग्नेशची वाट पाहत राहिले.
दीराच्या एका प्रश्नाने उलगडला खुनाचा थरार
मात्र, या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती जिग्नेशचा भाऊ अशोक ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीत असताना. त्याने, त्याची वहिनी पृथ्वी हिच्याकडे जिग्नेशच्या कंपनीचा पत्ता मागितला. मी ऑस्ट्रेलियाला जाणारच आहे, सो मी त्याला तिथे भेटेन असं म्हणत त्याने पत्त्याची मागणी केली. मात्र ते ऐकूनही ती पत्ता देत नव्हती, पतीचा पत्ता सांगण्यास ती सतत टाळाटाळ करू लागली . ते पाहून दीराचा संशय अधिकच बळावला. अखेर त्याने तिला खडसावलं आणि पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. ते एकून पृथ्वीचं अवसानचं गळालं, ती प्रचंड घाबरली आणि आपण दोन वर्षांपूर्वी जिग्नेशची हत्या केल्याची कबुली तिने दिली.
15 फूट खोल गाडलेला सांगाडा बाहेर
आरोपींनी कबुली दिल्यानंतर, तो मृतदेह कुठे पुरला तेही सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत दरेड परिसरातील कारखान्यात खणून पाहिलं. सुमारे 12 ते 15 फूट खोल खड्ड्यातून जिग्नेशच्या सांगाड्याचे अवशेष बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.