
भारतात बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या मार्गावर भारत सुरुवातीला जपानमध्ये तयार झालेली E5 मॉडलच्या बुलेट ट्रेनची ट्रायल घेणार आहे. त्यानंतर E10 मॉडलची नवीन बुलेट ट्रेन खरेदी करणार आहे. E10 ट्रेन भारत आणि जपानमध्ये एकाच वेळी म्हणजे 2030 च्या जवळपास सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद दरम्यान तयार होत असलेल्या हायस्पीड कॉरिडोरवर नवीन E10 जपानी बुलेट ट्रेन धावणार आहे. हा कॉरिडोर 508 किलोमीटर लांब आहे. हा मार्ग गुजरातमधून 352 किलोमीटर तर 156 किलोमीटर महाराष्ट्रातून जातो. हायस्पीड कॉरिडोर जपानमधील शिंकानसेन तंत्रज्ञानाने बनवला जात आहे.
जपानच्या शिंकानसेन सध्या E5 ट्रेन चालवत आहे. त्याची पुढील जनरेशन E10 असणार आहे. जपान आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागिदारी पाहता, जपान सरकारने या प्रकल्पासाठी E10 शिंकानसेन ट्रेन देण्यास सहमती दर्शविली आहे. म्हणजेच जपान भारताला सर्वात अत्याधुनिक बुलेट ट्रेन देणार आहे.
बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या रिपोर्टनुसार, 310 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेनचे कमर्शियल ऑपरेशन 2027 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. पूर्वी रेल्वे बोर्ड बुलेट ट्रेनसाठी फक्त जपानी तंत्रज्ञानावर अवलंबून होते. परंतु आता देशातंर्गत कंपन्यांचाही या प्रकल्पात समावेश केला जात आहे. नुकतेच सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन प्रणालीचे कंत्राट युरोपियन तंत्रज्ञान आणि भारतीय कंपन्यांना देण्यात आले आहे. म्हणजेच भारत आता वेगवेगळ्या देशांमधील तंत्रज्ञान एकत्र करून बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पुढे नेत आहे.
शिंकानसेन ट्रेन खरेदीसाठी भारताची जपानी कंपनीसोबत बोलणी सुरु आहे. आधी E5 मॉडलची ट्रायल करण्यात येणार आहे. त्यामुळे ही ट्रेन भारतात चालवण्यासाठी किती प्रभावशाली आहे, त्याची चाचणी होणार आहे. तसेच भारतासाठी E10 ट्रेनमध्ये काय बदल करावे लागणार आहे, त्याची माहितीसुद्धा मिळणार आहे. तसेच भारत सरकारने इंटीग्रल कोच फॅक्ट्रीला 280 किलोमीटर प्रतीतास वेगाने बुलेट ट्रेन बनवण्याचे काम दिले आहे. म्हणजेच भारत स्वत: बुलेट ट्रेन बनवण्याची तयारी करत आहे.