Kerala Floods | बिलगून झोपणाऱ्या बहिणींना एकाच शवपेटीत अखेरचा निरोप

केरळमधील कवलप्परा गावात झालेल्या भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या दोन चुलत बहिणींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रोज रात्री एकमेकींच्या कुशीत झोपणाऱ्या दोघींना एकाच शवपेटीतून अखेरचा निरोप देण्यात आला.

Kerala Floods | बिलगून झोपणाऱ्या बहिणींना एकाच शवपेटीत अखेरचा निरोप

तिरुअनंतपुरम : केरळमधील कवलप्परा गावात झालेल्या भूस्खलनात (Kerala Landslide) 40 घरं गिळंकृत झाली. यामध्ये चार वर्षांची  अनघा आणि आठ वर्षांच्या अलीना यांनाही प्राण गमवावे. रोज रात्री एकमेकींना घट्ट बिलगून झोपणाऱ्या चुलत बहिणींना निरोप देताना गावकऱ्यांना हुंदका अनावर झाला. चिरनिद्रेतही दोघींनी एकमेकींच्या समीप राहावं, यासाठी त्यांच्या पालकांनी एकाच शवपेटीत दोघींवर अंत्यसंस्कार केले.

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील भूथनममध्ये सेंट मेरी चर्चजवळ साश्रू नयनांनी अनघा-अलीना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. एकाच शवपेटीमध्ये दोघींचे निष्प्राण देह गुंडाळून ठेवण्यात आले. दोघींचे चेहरे पाहताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा कवलप्परा गावाला गुरुवार रात्रीच्या काळोखात भूस्खलनाच्या भीषण संकटाला सामोरं जावं लागलं. या डोंगराच्या टोकावर होतं विक्टर आणि थॉमस यांचं घर. दोघं सख्खी भावंडं आपापल्या बायका, आणि एकूण पाच मुलांसोबत राहत होती.

भूस्खलन झालं, त्यावेळी थॉमस घरात नव्हता. विक्टर, घरातल्या दोघी महिला दोन महिन्यांच्या बाळासह तीन मुलांना घेऊन बाहेर पडला. मात्र त्यांना अनघा आणि अलीना यांना बाहेर काढता आलं नाही. सर्वांना सुरक्षित स्थळी नेल्यानंतर दोन तासात विक्टर पुन्हा घराजवळ आला. आपल्या लेकरांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न तो करत होता, तितक्यात मुलगी अलीनाचा पुसटसा आवाज त्याच्या कानावर पडला.

रात्रीच्या अंधारातही विक्टरच्या जीवात जीव आला. बळ एकवटून इतर गावकऱ्यांच्या मदतीने त्याने खणायला सुरुवात केली. एक तास गेला, दोन तास गेले, पण मुलींचा शोध काही लागत नव्हता. एवढ्या वेळात आतून येणारा आवाजही क्षीण होत गेला होता. गावकऱ्यांनी त्याला धोक्याची जाणीव करुन दिली, त्यामुळे तो हताश होऊन परतला.

पोटची लेकरं अडकल्यामुळे विक्टरच्या मनाचं समाधान होत नव्हतं. शुक्रवारी सकाळी दहा वाजता तो पुन्हा आला. थोड्या वेळाच्या प्रयत्नानंतर पुतणी अनघाला बाहेर काढण्यात त्याला यश आलं. तिचा श्वास सुरु असल्याचं गावकऱ्यांना जाणवलं. अनघाला जवळच्या एका घरात नेण्यात आलं. मात्र तिला रुग्णालयापर्यंत नेण्याची खटपट अयशस्वी ठरली. त्या काळरात्री घरात नसलेला थॉमस कसाबसा गावी परतला, तोपर्यंत दुर्दैवाने त्याची चार वर्षांची चिमुकली अनघाने प्राण सोडले होते.

स्वतःच्या लेकीच्या मृत्यूचं दुःख उराशी कवटाळलेलं असतानाच थॉमस भावाच्या मुलीचा शोध घेण्यासाठी पुन्हा गेला. मात्र घरातल्या काँक्रिट स्लॅबनेच त्यांचा घात केला होता. तो काढेपर्यंत शनिवारची सकाळ उगवली. तेव्हा अलीनानेही अखेरचा श्वास घेतला होता.

अलीना-अनघासह चौदा जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. मात्र 55 जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *