Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला भारतीय सैन्याने घेरलं, मशिदीमधून त्याने आवाज दिला ‘अल्लाह शिवाय माझ्यासोबत कोणी नाही’
Indian Army : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये CRPF च्या चौकीवर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाइंडला भारतीय सैन्याने चहूबाजूंनी घेरलं आहे. तो मशिदीमध्ये लपलाय.

कुलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड लतीफ भटला भारतीय सैन्याने चहूबाजूने घेरलं आहे. जम्मू-काश्मीरच्या दक्षिणेला कुलगाम जिल्ह्यात सुरक्षापथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय सैन्याने दहशतवादी लतीफ भटला सरेंडर करण्याचं आवाहन केलं आहे. पण लतीफ शस्त्र टाकेल असं वाटत नाहीय. लतीफ भटला व्हिडिओ कॉल करुन शस्त्र टाकण्यास सांगण्यात आलं. 9 राष्ट्रीय रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसरने लतिफ भटला शेवटची संधी दिली आहे. त्याने आत्मसमर्पण केलं तर त्याचा जीव वाचू शकतो. पण लतीफ भटने स्पष्टपणे आत्मसमर्पण करण्यास नकार दिला आहे. ‘अल्लाह शिवाय माझ्यासोबत कोणी नाही’ हे त्याचे शब्द आहेत.
लतीफ भटकडे आत्मसमर्पण करण्याची ही शेवटची संधी आहे. अशा प्रकारच्या ऑपरेशन्समध्ये एक स्टँडर्ड प्रोसेस वापरली जाते. आरोपीला सरेंडर करण्याची संधी दिली जाते. पण तो ऐकला नाही तर ऑपरेशन केलं जातं. गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर दिलं जातं. लतीफ भट कुलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या प्रकरपणाच्या चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. कुलगाममध्ये हल्ला घडवून आणण्याआधी दहशतवादी उमर निसार डारने लश्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट सोबत मिळून अनेक भागांची रेकी केली होती.
#WATCH | Jammu and Kashmir: Encounter underway between security forces and terrorists in Kulgam
(Visuals deferred by unspecified time; no live operational details disclosed) https://t.co/NCv1e2KLWs
— ANI (@ANI) November 18, 2026
सुरक्षा एजन्सीने काय माहिती दिली?
सीसीटीव्ही मधून दोघांच्या कारस्थानाचा, प्लानिंगचा उलगडा झाला. 10 नोव्हेंबर 2026 रोजी उमर निसार डार आणि लष्करचा कमांडर लतीफ भट यांनी कुलगाममधील अनेक भाग पालथे घातले होते. सुरक्षा एजन्सींनी ही माहिती दिली. मीरबाजार, अखरान, हबलिश आणि किलम या भागांमध्ये दोघे फिरले. सुरक्षापथकांवर कुठून हल्ला करता येऊ शकतो याची पाहणी करण्यासाठी हे दोघे या परिसरात फिरले होते. दुसऱ्यादिवशी 11 नोव्हेंबरला दोघांनी मिळून अखरान येथे CRPF च्या एका चौकीवर हल्ला केला. त्यानंतर दोघे फरार झाले होते.
