
Delhi Lal Kila Blast Update : दिल्लीतील लाल किल्ला येथील स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटाची एक एक कडी जुळवण्यात पोलिसांना यश आले आहे. आता राष्ट्रीय तपास यंत्रणांची पण एंट्री झाली आहे. या स्फोटाचे जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणातील फरिदाबादजवळील धौज गावाशी संबंध समोर येत आहे. J&K पोलिसांनी सर्वात अगोदर आदिल याला अटक केली. त्यानंतर या नेटवर्कची एकाहून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याआधारे डॉक्टर मुझम्मिलला पकडण्यात आले. आतापर्यंत काय अपडेट आली समोर?
आदिलची अटक आणि कटाचा सुगावा
जम्मू काश्मीर पोलिसांनी सर्वात अगोदर डॉ. आदिल अहमद राठर याला अटक केली. त्याने त्याच्याशी संबंधित इतर लोकांची माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी तपासाला लागलीच गती दिली. 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या नेटवर्कमधील सदस्य डॉ. शकील याला अटक केली. त्याची दीर्घ चौकशी केल्यानंतर त्याने हरियाणातील फरिदाबाद येथील धौज गावात मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्र लपवल्याचे मान्य केले. त्याच्या वक्तव्याआधारे पोलिसांचे पथक रविवारी पहाटे फरीबादाद येथे पोहचले. तिथल्या घराची तपासणी केली. हा साठा पाहून पोलिसही चक्रावले.
डॉ. मुजम्मिलला ठोकल्या बेड्या
देशातील तीन शहरात भीषण स्फोट घडवण्याची आरोपींची योजना होती. या ऑपरेशनमधील अजून एक आरोपी डॉ. मुजम्मिल याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. हा आरोपी फरीदाबाद येथील अल-फलाह या विद्यापीठात शिक्षक आहे. तो आणि अजून एक जण या स्फोटामागील ब्रेन मानण्यात येत आहे.
स्फोटकं, शस्त्र आणि IED जप्त
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जवळपास 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडले. हा सर्वाधिक ज्वलनशील घटक आहे. IED तयार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतो. पोलिसांच्या मते हा घटक RDX नाही. पण अत्यंत घातक आहे. त्याआधारे मोठा स्फोट घडवण्यात येऊ शकतो. या तपासात जवळपास 5 किलो धातू आढळला. त्याचा वापर IED ची घातक क्षमता वाढवण्यासाठी करण्यात येतो. यासह 20 टायमर, बॅटरी, 24 रिमोट, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किटही पोलिसांनी जप्त केले. हे संपूर्ण सामान, साहित्य IED तयार करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शस्त्रांचा मोठा साठा जप्त
फरीदाबाद येथील छाप्यात पोलिसांनी एक असॉल्ट रायफल, जी AK-47 सारखीच पण त्यापेक्षा छोटी दिसली. यासह तीन मॅगझीन, 84 जिवंत काडतूस, एक पिस्तूल, आठ राऊंड, दोन रिकामी काडतूसं आणि एक सूटकेस ही जप्त केली. यामध्ये इतर काही स्फोटकं आणि उपकरणं लपविण्यात आली होती. या टीमकडे अनेक वॉकी-टॉकी सेट आणि इतर दूरसंचार उपकरणं असल्याचे समोर आले आहे.
दहशतवादी हल्ल्याचाच कट
सुरुवातीच्या तपासात जे आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यावरून ते मौलाना मसूद अझहरच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. हा एक दहशतवादी कट असल्याचे सध्या तरी समोर येत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे मनसुबे धौज गावातील स्फोटक साहित्य जप्त केल्याने उधळले गेले. त्यांना देशातील अनेक मोठ्या शहरात स्फोट घडवायचा होता. दिल्लीतील स्फोट हा आत्मघातकी स्फोट असल्याचा संशय पोलिसांना येत आहे.