सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट; वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक, केक पाहून चकीत व्हाल
सरकारी इंजिनीअरचा राजेशाही थाट व्हायरल झाला आहे. भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या इंजिनीअरची चक्क वाढदिवसाच्या दिवशी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.

मध्य प्रदेशच्या उज्जेन जिल्ह्यातून चकीत करणारा प्रकार समोर आला आहे. उज्जैनच्या पश्चिम विभागाच्या वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता असलेल्या रविकांत मालवीय याच्या वाढदिवसाची पार्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या इंजिनीअरची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढल्याचेही समोर आलं आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून वाढदिवसाची भव्य दिव्य पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतील केक देखील हटके होता. परंतु सरकारी कार्यालयातील खासगी कार्यक्रम आयोजित केल्याने वादाला तोंड फुटलं आहे.
कार्यालयात इंजिनीअरचा राजेशाही थाट होता. या इंजिनीअरने ढोल ताशाच्या गजरात सरकारी कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात पोहोचल्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर या पार्टीवरून अनेक सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत. वाढदिवसाला फक्त राजेशाही थाट नव्हता. तर केक देखील नोटांच्या बंडलचा होता. केकवर फक्त सजावटीसाठी बनावट नोटा चिकटवल्या होत्या. एका इंजिनीअरने केलेल्या शक्ती प्रदर्शनाची जोरदार चर्चा होत आहे.
एका दिवसाआधी इंजिनीअरवर भ्रष्ट्राचाराचा आरोप
शासकीय कार्यालय रविवारी बंद असते. मग कार्यालय उघडण्याची परवानगी कोणी दिली? कोणत्या बड्या अधिकाऱ्याने शासकीय कार्यालयात वाढदिवसाची पार्टी करण्याची परवानगी दिली आहे का? एका शासकीय कार्यालयात खासगी कार्यक्रमाची परवानगी कशी काय दिली जाऊ शकते? वाढदिवसाच्या दिवशी सरकारी कर्मचारी उपस्थित होते का? शासकीय सुट्टी होती, तर कर्मचाऱ्यांनी हजेरी कशी लावली? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तत्पूर्वी, एका दिवसाआधी या इंजिनीअरवर भ्रष्टाराचाराचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यामुळे इंजिनीअर रविकांत मालवीय चर्चेत आला होता. कार्यालयातील वाढदिवसाच्या पार्टीवरून आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कार्यालयात या इंजिनीअरने मित्रांसोबत डान्स केला. त्यांचा पाहुणचार देखील केला. सरकारी कार्यालयात भारतीय नोटांची प्रतिमा असलेला केक कापल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. या प्रकारचा केक कापून इंजिनीअरने अपमान केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे.