
प्रयागराजला महाकुंभ सुरू आहे. शतकातून येणारा हा अत्यंत महत्त्वाचा महाकुंभ आहे. त्यामुळे कोट्यवधी भाविक या महाकुंभात सामील झाले आहेत. विविध भाषा बोलणारे देशातील कानाकोपऱ्यातील लोक या महाकुंभात आले आहेत. त्यामुळे अख्खा देशच या ठिकाणी अवतरल्याचं चित्र दिसत आहे. फक्त देशातूनच नाही तर विदेशातूनही विदेशी पर्यटक महाकुंभात आले आहेत. या ठिकाणी श्रद्धेने पूजापाठ करत आहेत. संगमात जाऊन डुबकी मारत आहेत. मात्र, अशा ठिकाणी काही विकृत गोष्टीही घडताना दिसत आहे. काही लोक या महाकुंभात अंघोळ करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या स्त्रियांचे व्हिडीओ काढून ते विकत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवातही केली आहे.
महाकुंभात 55 कोटी लोक आले आहेत. सर्व श्रद्धाळू गंगेत डुबकी मारत आहेत. गंगेत पवित्र स्नान करण्यासाठीच लोक या ठिकाणी येत आहेत. मात्र, काही लोक या अंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ काढत आहेत. त्यांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढून इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्रामवर पोस्ट करत आहेत. काही लोक तर हे व्हिडीओ विकतही आहेत. 1999 ते 3000 रुपयांपर्यंत हे व्हिडीओ विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुन्हे दाखल
हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर प्रयागराज पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी हे व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या आणि विकणाऱ्या अकाऊंटविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. श्रद्धाळू महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो करून आणि टेलिग्रामवर विकले जात आहेत. त्यांच्याविरोधात आम्ही गुन्हे दाखल केले आहे. आता या लोकांची ओळख करून त्यांना अटक केली जाणार आहे, असं पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं.
पोलिसांची पेट्रोलिंग
या प्रकारानंतर पोलिसांच्या सायबर टीमने इंटरनेट मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर सातत्याने पेट्रोलिंग सुरू केली आहे. आपत्तिजनक पोस्ट करणाऱ्यांविरोधात आणि अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. सायबर पेट्रोलिंग करत असतानाच महिलांचे अंघोळ करतानाचे फोटो इंटरनेट मीडियावर अपलोड करण्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
लवकरच अटक होणार
पोलिसांनी इन्स्टाग्रामवरील @neha1224872024 या अकाऊंटच्या विरोधात कारवाई केली आहे. या अकाऊंटवरून अंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले होते. पोलिसांनी या अकाऊंटबाबतची माहिती मेटा कंपनीकडून मागवली आहे. लवकरच या आरोपीवर कारवाई केली जाणार आहे.