
भारतीय सैन्य देशसेवेसाठी कायम तत्पर असते. अशीच एक घटना झाशीतून समोर आली आहे. मेजर बचवाला रोहित यांनी झाशी रेल्वे स्थानकावर आपात्कालिन परिस्थितीत एका गर्भवती महिलेची प्रसुती केली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही मेजर बचवाला रोहित यांचे कौतुक केले, लष्कराने आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
समोर आलेल्या माहितीनुसार, मेजर रोहित 5 जुलै रोजी झाशीवरून हैदराबादला निघाले होते. त्यावेळी एक गर्भवती महिला व्हीलचेअरवरून खाली पडली होती, तिला प्रसुती वेदना होत होत्या. हे पाहून मेजर रोहित मदतीला धावले, त्यांनी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या साध्या वस्तू टॉवेल, चाकू आणि केसांच्या क्लिप वापरून एक रुम तयार करत महिलेची प्रसूती केली.
Honouring a selfless service beyond the call of Duty #GeneralUpendraDwivedi, #COAS, today commended Major Bachwala Rohit for demonstrating exceptional professional acumen and selfless commitment beyond the call of duty.
On 05 Jul 2025, while proceeding on leave from Military… pic.twitter.com/fFpsD54EUS
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 7, 2025
मेजर रोहित यांच्या या निर्णयामुळे आई आणि नवजात बाळाचे प्राण वाचले. यानंतर मेजर रोहित यांच्या कार्याची माहिती लष्करापर्यंत पोहोचली. आता लष्कराने मेजर रोहित यांचा हातात नवजात बाळ धरल्याचा आणि त्याच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या महिलेला आणि बाळाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
लष्कराने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर रोहित यांचा त्यांच्या तत्परतेचा आणि निर्णयाचा त्यांच्या गणवेशावर प्रशंसा चिन्ह लावून सन्मान केला. लष्कराने या घटनेला निःस्वार्थ सेवेचे प्रतीक असे म्हटले आहे.
लष्कराने काय म्हटले?
लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘कर्तव्यपलीकडे निःस्वार्थ सेवेचा सन्मान. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कर्तव्यपलीकडे जाऊन निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल मेजर बचवाला रोहित यांचे कौतुक आणि सन्मान केला.’ दरम्यान भारतीय लष्कराच्या या शूर मेजरने दाखवलेल्या उदारतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.