Rishabh Pant : ऋषभ पंतचा ज्याने जीव वाचवला, तोच आज जीवन-मरणाशी देतोय झुंज ! विष घेतलं आणि…
भारताचा नामवंत क्रिकेटर रिषभ पंत हा दोन वर्षांपूर्वी मर्सिडीज कार अपघातात प्रचंड जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून आलेल्या तरूणाची बरीच चर्चा झाली होता. मात्र आता तोच जीवन-मरणाशी झुंज देतोय. त्याने विष-प्राशन केलं आणि..

भारतीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत हा बराच चर्चेत असतो. दोन वर्षांपूर्वी त्याच्या कारचा मोठा अपघात झाला, त्यामध्ये ऋषभ एवढा जबर जखमी झाला होता की तो जगतो-वाचतो की नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. मात्र त्यावर जिद्दीने मात करून तो पुन्हा उभा राहिला आणि भारतीय संघात पुनरागमन करत जबर खेळीही केली. मात्र ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा एका तरूणाने त्याचा जीव वाचवला होता. 30 डिसेंबर 2022 मध्ये ऋषभचा हा मोठा अपघात झाला, त्यावेळी रजत नावाच्या तरूणाने त्याचा जीव वाचवला होता. मात्र आता तोच रजत हा जीवन-मरणाशी झुंज देतोय. त्या रजतने गर्लफ्रेंडसह विष प्राशन केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये त्या तरूणीचा तर विषामुळे मृत्यू झाला आहे मात्र रजत अजूनही जगण्या-मरण्याची लढाई लढत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजत हा मुझफ्फरनगरमधील शकरपूर येथील माजरा बुच्चा बस्ती येथील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी रजतने त्यांच्या मुलीला आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर तिला विष पाजण्यात आले, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीची आई कमलेश हिने रजत आणि इतरांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र सध्या रजत याचीच प्रकृती चिंताजनक आहे. शुद्धीवर आल्यानंतर पोलिस त्याचा जबाब नोंदवतील.
पाच वर्षांपासून अफेअर
क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्या रजतचे गेल्या पाच वर्षांपासून मनू नावाच्या 21 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. एवढंच नव्हे तर , दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवलं होतं. घरच्यांच्या या वागण्यामुळे दुखावलेल्या प्रेमी युगुलाने ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शेतात जाऊन विष प्राशन केले होते. दोघेही बेशुद्ध अवस्थेत शेतात पडल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून त्यांना उत्तराखंडमधील झाब्रेडा येथील नर्सिंग होममध्ये दाखल केले. मंगळवारी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर रजतवर अद्याप उपचार सुरू आहेत.
पंतने गिफ्ट केली होती स्कूटी
30 डिसेंबर 2022 रोजी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा रजत हा त्याच्यासाठी देवदूत बनून धावत आला. ऋषभची मर्सिडीज कार डिव्हायडरला जोरात धडकली होती. त्यावेळी ऋषभ हा कारने रुरकीला जात होता. मात्र वाटेतच त्याचा मोठा अपघात झाला. तेव्हाच रजतने मतदीसाठी धाव घेत त्याला रुग्णालयात पोहोचवलं. अपघातात जखमी झालेला ऋषभ पंत हळूहळू बरा झाला आणि अनेक महिन्यांच्या उपचारानंतर क्रिकेटच्या मैदानात परतला. त्यानंतर ऋषभ पंतने रजत आणि अन्य मदतनीस यांना स्कूटी भेट देऊन त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांचे आभार मानले होते. पण तोच रज आज एवढं मोठं, टोकाचं पऊल उचलेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. एकाचे प्राण वाचवणारा रज आज स्वत:च्याच आयुष्यासाठी मात्र लढत आहे.