..तर ‘मातोश्री’ही अडचणीत येऊ शकते!, अनिल परबांच्या ईडी चौकशीवरुन रवी राणांचा सूचक इशारा

| Updated on: Aug 19, 2022 | 8:25 PM

'ईडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे चौकशी करते. या सगळ्या लिंक 'मातोश्री'पर्यंत गेल्या तर 'मातोश्री'ही अडचणीत येऊ शकते. आम्ही फक्त हनुमान चालीसा म्हणालो तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. जो जो घोटाळा करेल त्यावर कारवाई होणार'.

..तर मातोश्रीही अडचणीत येऊ शकते!, अनिल परबांच्या ईडी चौकशीवरुन रवी राणांचा सूचक इशारा
उद्धव ठाकरे, नवनीत राणा आणि रवी राणा
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील कथित फार्महाऊसबाबत ईडीकडून चौकशी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिलाय. पुढच्या काळात अनिल परब यांचीही चौकशी होणार. ईडी ही स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे चौकशी करते. या सगळ्या लिंक ‘मातोश्री’पर्यंत गेल्या तर ‘मातोश्री’ही अडचणीत येऊ शकते. आम्ही फक्त हनुमान चालीसा म्हणालो तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. जो जो घोटाळा करेल त्यावर कारवाई होणार. संजय राऊतांवरील (Sanjay Raut) कारवाईही योग्यच असल्याचा दावा रवी राणा यांनी केलाय.

रवी राणा विरुद्ध ठाकरे, राऊत

आमदार रवी राणा हे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर राणा दाम्पत्य ठाकरेंवर टीकेची झोड उठवत आहेत. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. त्यावरुन ‘संजय राऊत यांना खूप आधी अटक व्हायला पाहिजे होती. ईडीकडे संजय राऊतां विरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे आहेत. संजय राऊत दोन ते तीन वर्षे जेलमध्ये राहतील. जेलमध्ये गेल्यावरच संजय राऊत यांचा डोकं ठिकाणावर येईल’, अशी टीका राणा यांनी केली होती.

‘संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी आहेत’

तसंच संजय राऊत हे शरद पवारांचे नंदी आहेत. राऊत यांनी सामना पेपर सांभाळला पाहिजे. राऊत पवारसाहेबांच्या हृदयात जाऊन बसले आहेत. राऊत पवारांचे पगारी नोकर झालेत. राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे, असा प्रश्न पडतो. ते उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व बुडवूनच शांत बसतील, अशी खोचक टीकाही रवी राणा यांनी राऊतांवर केली होती.