
World Most Powerful Countries List: जगातील सर्वात शक्तिशाली देशांची चर्चा होते. तेव्हा ज्या देशांच्या निर्णयाचा जागतिक धोरणावर परिणाम होतो. ज्यांची लष्करी ताकद अधिक असते. तर व्यापारात ज्यांची दादागिरी चालते त्यांची चर्चा अगोदर होते. त्यांचे परराष्ट्र धोरण, संरक्षणावरील खर्च आणि त्यांची आर्थिक गती याकडे जगाचे लक्ष असते. US News and World Report नुसार 2005 मध्ये जागतिक सत्ता संतुलन आता अधिक सुस्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिका हा निर्विवाद पहिल्या स्थानावर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
अमेरिकेचा दबदबा कायम
या अहवालानुसार, अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या स्थानी रशिया हा देश आहे. सौदी अरब हा नवव्या क्रमांकावर तर इस्त्रायल या यादीत 10 व्या क्रमाकांवर आहे. अमेरिका अर्थव्यवस्था, जगातील सर्वात मोठे संरक्षण बजेट आणि आयटी कंपन्यांमुळे दीर्घकाळापासून ग्लोबल पॉवर म्हणून अग्रेसर आहे. चीनने गेल्या 20 वर्षांत भूतो न भविष्यती अशी कामगिरी करत जगातील दिग्गजांना पिछाडीवर टाकले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेत चीनने अढळ स्थान निर्माण केल्याने तो यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर लष्करी ताकद, नैसर्गिक खनिज संपत्ती, इंधनाच्या बळावर रशिया या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ब्रिटेन, जर्मनी अग्रेसर
World Population Review नुसार, ब्रिटेन तांत्रिक स्टार्टअप्ससाठी मोठे केंद्र म्हणून पुढे आला आहे. जर्मनी अक्षय ऊर्जा क्षेत्रात पुढे आला आहे. तर फ्रान्सने औद्योगिक क्षेत्रात पुन्हा मोठ्या क्रांतीला हात घालत स्पर्धेत असल्याची चुणूक दाखवली आहे. युरोपियन देश सुद्धा या यादीत अग्रस्थानी येण्यासाठी स्पर्धेत उतरले आहेत.
US News and World Report च्या अहवालानुसार, ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढलेली असतानाही आणि नवीन मुलं जन्माला न घालणारी पिढी येत असतानाही जपान आणि दक्षिण कोरियाने हार पत्करलेली नाही. हे दोन्ही देश जगातील शक्तिशाली देशांच्या यादीत टॉप-10 मध्ये आहेत. दक्षिण कोरिया तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जेत अग्रेसर आहे. तर जपान सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात मोठी गुंतवणूक करत आहे.
भारत यादीत कुठे?
जगातील सर्वाधिका लोकसंख्येचा देश असलेला भारत, अर्थव्यवस्थेत आता तिसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. राजकीय प्रभाव, लष्करी ताकद आणि कुटनीतीत अग्रेसर असलेल्या भारताला या यादीत मोठी झेप घेता आलेली नाही. भारत अजूनही टॉप-10 मधून बाहेरच आहे. आखाती देशांना या यादीत भारताच्या अगोदर स्थान आहे. त्यावरून भारताला मोठी मजल मारायची असल्याचे दिसून येते.