Operation Sindoor : बाळासाहेबांचं ते वाक्य खरं ठरलं, मोदींनी पाकिस्तानात जाऊन.., अरविंद सावंतांनी घेरलं!

अरविंद सावंत यांनी संसदेत सरकारला चांगलंच घेरलं. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवरी सरकारची लक्तरं काढली. सरकारने लष्कराला का रोखलं, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

Operation Sindoor : बाळासाहेबांचं ते वाक्य खरं ठरलं, मोदींनी पाकिस्तानात जाऊन.., अरविंद सावंतांनी घेरलं!
arvind sawant
| Updated on: Jul 28, 2025 | 5:18 PM

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत सविस्तर चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलं? त्यात पाकिस्तानचे किती नुकसान झाले? या प्रश्नांचीही उत्तरं दिली. दरम्यान, पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे मोठे नुकसान झालेले नाही, असे केंद्र सरकारने सांगितले. विरोधी बाकावरील पक्षांनी मात्र ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवरून मोदी सरकारला चांगलंच घेरलं. भारताने पाकिस्तानसोबत विनाअट शस्त्रसंधी का केली? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.

भारतासोबत कोणीही उभे राहिलेले नाही

ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर भारत सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये प्रतिनिधी पाठवले. या ऑपरेशनबद्दल सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी या प्रतिनिधींवर होती. मात्र हे प्रतिनिधी ज्या-ज्या देशात गेले त्या कोणत्याही देशाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही दहशतवादाविरोधातील मोहिमेत भारतासोबत आहोत, असे सांगितले नाही. भारतासोबत कोणीही उभे राहिलेले नाही, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

तसेच, पाकिस्तानसोबत विनाअट शस्त्रसंधी का केली. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची हीच योग्य वेळ होती. पाकिस्तानविरोधातील मोहिमेला सिंदूर हे नाव देणे म्हणजे भावनांशी खेळ आहे, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला.

त्यांना कोणीही बोलवलं नव्हतं तरी…

आपले सीडीएस सांगतात की आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. राष्ट्र म्हणून आपण सगळे एक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटायला गेले होते. त्यांना कोणीही बोलवलं नव्हतं तरी ते गेले होते. त्यांनी तिथे जाऊन लाहोरच्या ट्रेनविषयी चर्चा केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की पाकिस्तान सापासारखा आहे त्याला कितीही दूध पाजले तरी ते विषच ओकणार असे बाळासाहेब ठाकरे म्हणले होते. ते आज खरे ठरले, असेही अरविंद सावंत म्हणाले.

मग लष्कराला त्यांनी रोखलं का?

आम्ही पाकव्याप्त काश्मीर परत घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सत्ताधारी सांगतात. मग हीच योग्य वेळ होती. तुम्हाला कोणी थांबवले होते. पाकिस्तानातील नऊ तळांवर हल्ला करून फार मोठं काम केलंय, असं समजू नका. लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य द्या. सरकारने सांगितलं की आम्ही लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मग त्यांना रोखलं का? असा सवालही अरविंद सावंत यांनी केला.