मंत्रिमहोदय नेटवर्कसाठी 50 फूट आकाश पाळण्यावर चढले, नेटकरी म्हणाले, झोपाळ्याची मजा घ्या

| Updated on: Feb 22, 2021 | 4:59 PM

मंत्री बृजेंद्र सिंह यादवांना सध्या दिवसातील तीन तास आकाश पाळण्यावर काढावे लागत आहेत (MP Minister Brajendra Singh Yadav climbs atop 50 feet high swing for mobile signal).

मंत्रिमहोदय नेटवर्कसाठी 50 फूट आकाश पाळण्यावर चढले, नेटकरी म्हणाले, झोपाळ्याची मजा घ्या
Follow us on

भोपाळ : मोबाईल हा आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलाय. जगभरातील एकूण देशांपैकी भारतात सर्वाधिक मोबाईल यूजर्स आहेत. मात्र, तरीदेखील भारतातील नागरिकांना मोबाईलच्या नेटवर्कची सुविधा पुरेसी मिळत नाही. अनेक गाव-खेड्यांमध्ये गेल्यावर मोबाईलचं नेटवर्क गायब होतं. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतं. असाच काहीसा प्रकार सध्या मध्य प्रदेशचे मंत्री बृजेंद्र सिंह यादव यांच्यासोबत घडताना दिसत आहे. मात्र, त्यावर त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. कुणालाही फोन करायचं असल्यास ते आकाश पाळण्यावर बसून जमिनीपासून थेट 50 फूट उंचावर जातात. तिथे ते फोनवर बातचित करतात आणि नंतर पुन्हा खाली येतात (MP Minister Brajendra Singh Yadav climbs atop 50 feet high swing for mobile signal).

दिवसभरातील तीन तास आकाश पाळण्यावर

विशेष म्हणजे मंत्री बृजेंद्र सिंह यादवांना सध्या दिवसातील तीन तास आकाश पाळण्यावर काढावे लागत आहेत. अशी कसरत त्यांना पुढचे आणखी काही दिवस करावी लागणार आहे. यामागे लोकांची, सर्वसामान्य जनतेची सेवा हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

बृजेंद्र सिंह यादव हे शिवराज सिंह चौहान सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. ते मध्य प्रदेशचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आहेत. त्यांचं सुरेल हे गाव आहे. या गावात सध्या भगवतगीता पठाणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंत्री यादव हे या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून गेले आहेत. मात्र, गावात नेटवर्क नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

मंत्री यादव सुरेल गावात ग्रामस्थांच्या समस्यादेखील सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दररोज दिवसातील तीन तास ते गावात जनता दरबार भरवत आहेत. या तीन तासात ते आकाश पाळण्यावरुन खाली उतरत नाहीत. कुणी काही समस्या घेऊन आलं तर त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांना फोन करावा लागतो. त्यामुळे ते आकाश पाळण्यावरच बसतात. फोन करायचं असल्यास ते 50 फूट उंचावर जातात. फोनवर बोलणं संपलं की पुन्हा खाली येतात (MP Minister Brajendra Singh Yadav climbs atop 50 feet high swing for mobile signal).

मंत्री बृजेंद्र सिंह यादव यांची प्रतिक्रिया

“मी इथे भागवत कथेच्या पठणाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी आहे. मला इथे नऊ दिवस राहायचं आहे. यादरम्यान काही लोक आपल्या समस्या घेऊन येतात. मात्र, इथे नेटवर्कची समस्या असल्याने माझं अधिकाऱ्यांशी बोलणं होत नाही. त्यामुळे मी येथील आकाश पाळण्यावर बसून वर जातो. तिथे अधिकाऱ्यांना फोन करुन योग्य त्या सूचना देतो आणि लोकांच्या समस्यांचं निराकरण करतो”, अशी प्रतिक्रिया स्वत: मंत्री यादव यांनी दिली आहे.

नेटीझन्सकडून टीकेची झोड

दरम्यान, मंत्री यादव केवळ फोन करण्यासाठी आकाश पाळण्यावर बसून 50 फूट उंचावर जातात, या गोष्टीवरुन चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सकडून मंत्री यादव यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला आहे. मंत्री आकाश पाळण्यावर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नाही तर मौज करण्यासाठी, हौसेसाठी जातात, असा आरोप काही लोकांकडून केला जातोय.

हेही वाचा : तब्बल सातवेळा संसदेवर, खासदार मोहन डेलकर यांची मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या